
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ‘रेड अलर्ट’
पुणे, ता. ६ : कच्छमधील कमी दाबाचा पट्टा, विकसित होणारं चक्रीवादळ, कोकण किनारपट्टीलगतच द्रोणीय क्षेत्र आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांच्या प्रवाहामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट अर्थात अतिवृष्टीचा इशारा हवामानखात्याने दिला आहे.
आठवड्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात मॉन्सून सक्रिय झाला आहे. कोकणात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी मुंबईसह, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचे धुमशान सुरुच होते. पावसाचा जोर अधिक वाढत असतानाच गुरुवारी (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्रासह गुजरातमध्येही अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामानखात्याने वर्तवला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे.
कोकणात सततच्या पावसाने रस्ते खचणे, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सूर्या, जगबुडी, वाशिष्टी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. लगतच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात अनेक ठिकाणी १५० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर, प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर, लोणावळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद येथे पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाड्यासह, विदर्भातही ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडत आहे.
पावसाचे अपडेट
- कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस
- पश्चिम महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
- मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सामान्यतः ढगाळ वातावरण
- कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे, नगर येथे हलक्या सरी
- सांगलीत मुसळधार, साताऱ्यात सर्वदूर पाऊस
- अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यांत रिमझिम
- औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस वाढला
- २०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे
वसई २०१ (जि. पालघर), खालापूर २०१ (जि. रायगड), दापोली २२४ (जि. रत्नागिरी), महाबळेश्वर २१३ (जि. सातारा)
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25382 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..