
सत्तांतर होताच प्रकल्पांची माहिती मागवली
पुणे, ता. ६ : राज्यात सरकार बदलल्यानंतर आता पुणे शहरातील मोठ्या प्रकल्पांची माहिती राज्य शासनाकडून मागविण्यात आली असून, ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पुणे महापालिकेतील काही महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले होते. पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हे प्रकल्प मागे पडले आहेत, तर काही प्रकल्पांवर वाद निर्माण झाले आहेत. पण आता सत्तांतर झाल्याने पुन्हा हे प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून पुणे शहरातील समान पाणीपुरवठा, नदी सुधार प्रकल्प (जायका), नदीकाठ सुधार प्रकल्प, पीपीपीवरील रस्ते, एचसीएमटीआर मार्गावरील मेट्रो, कोथरूड-पाषाण बोगदा यासह इतर प्रकल्पांची माहिती मागविण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नदीकाठ सुधार प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण होईल, त्यामुळे हा प्रकल्प शहराच्या हिताचा नाही अशी भूमिका पर्यावरणप्रेमी संघटनांनी घेतली. या संदर्भात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे बैठक झाली होती त्यानंतर संघटनांचे आक्षेप दूर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बैठका होऊनही आक्षेप कायम आहे. तथापि, आता राज्यात सत्तांतर झाल्याने या प्रकल्पाला गती येईल, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या विविध विभागांकडून प्रकल्पांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे, लवकरच ही माहिती शासनाला दिली जाईल, अशी माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25423 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..