पुणे : विद्यार्थ्यांना सतावतेय प्रवेशाची चिंता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

11th admission
विद्यार्थ्यांना सतावतेय प्रवेशाची चिंता

पुणे : विद्यार्थ्यांना सतावतेय प्रवेशाची चिंता

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पुढील कार्यवाही होईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे राज्य मंडळाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल ९० हजार १०६ विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येते. तर राज्यात उर्वरित ठिकाणी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतले जातात. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत साधारणतः चार लाखांहून अधिक प्रवेश होतात.

पुणे जिल्ह्यातून एक लाख २८ हजार ५६७ नियमित, तर चार हजार ४६२ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत यंदा उत्तीर्ण झाले आहेत. सध्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला उशीर होत असल्याने विद्यार्थी निराश होत असल्याचे चित्र आहे. राजेश्वरी वैद्य (दहावीत ९९.२ टक्के) म्हणते,‘‘दहावीचा निकाल लागूनही अद्याप अकरावी प्रवेश प्रक्रियेला गती मिळालेली नाही. त्यामुळे उगाचच वेळ वाया जात असल्यासारखे वाटते.’’ राजेश्वरी कला शाखेत प्रवेश घेणार असून तिला मानसशास्त्रात उच्च शिक्षण घ्यायचे आहे. ती म्हणते,‘‘विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा विचार केला तर ते विद्यार्थी खासगी शिकवणी लावू शकतात.

परंतु कला शाखेच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि स्वत:चा अभ्यास यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्यास आमचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार हा प्रश्न आहे.’’ तर वाणिज्य शाखेतील प्रवेशास इच्छुक असणारा मैत्रेय नाईक (दहावीत ९७.८० टक्के) म्हणतो,‘‘अकरावीच्या प्रवेश अर्जातील भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू होणे गरजेचे आहे. हे असेच सुरू राहिल्यास अकरावीचे वर्ग सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू होतील. त्यामुळे महाविद्यालयात भराभर अभ्यासक्रम शिकवून पूर्ण केला जाईल. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.’’ रूपाली कांबळे हिला दहावीत ७५ टक्के असून तिला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. ती म्हणते,‘‘प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे आपल्या चांगले महाविद्यालय मिळेल का, महाविद्यालये उशिरा सुरू होतील, मग अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल का, असे प्रश्न पडत आहेत.’’

हे करणे शक्य :
१. सीबीएसई, आयसीएसईसह अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ठेवणे
२. इन हाऊस, व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी
३. बारावीची फेरपरीक्षा आणि अन्य मंडळांच्या मुलांसाठी त्या-त्यावेळी जागा वाढविणे शक्य

प्रवेश प्रक्रिया लांबल्यास होणारे परिणाम
- शिकविण्याचे दिवस कमी होतील
- मुलांच्या मानसिकतेवर परिणामाची शक्यता
- अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षक-विद्यार्थ्यांची कसरत


अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास शिकविण्याचे दिवस कमी होतात. त्यामुळे उर्वरित दिवसांत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसोटी असणार आहे. त्यामुळे सीबीएसईसह अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ठेवून इन-हाऊस आणि व्यवस्थापन कोट्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया एका बाजूला सुरू ठेवता येईल. तसेच बारावीच्या पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुढील टप्प्यात जागा वाढवून दिल्या जातात. त्या पद्धतीने अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी देखील जागा आरक्षित ठेवणे किंवा त्यानंतर वाढवून देणे शक्य होईल.
- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर)

दरवर्षी सीबीएसईच्या निकालानंतर राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होतो. मात्र, यंदा राज्य मंडळाचा दहावीचा निकाल सीबीएसईच्या निकालाआधी जाहीर झाला आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणाऱ्या शहराव्यतीरिक्त उर्वरित राज्यात सर्वत्र प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला जात आहे. या विद्यार्थ्यांची महाविद्यालये साधारणत: जुलै-ऑगस्टमध्ये सुरू होतात. परंतु प्रामुख्याने शहरी भागात खासगी शिकवण्यांमुळे
ऑनलाइन प्रवेश उशिरा होऊनही अभ्यासक्रम भरून काढला जातो, हे वास्तव आहे.’’
- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील प्रवेश -
तपशील : विद्यार्थ्यांची संख्या
- नोंदणी केलेले : ९०,१०६
- लॉक केलेले : ६४,३३९
- ॲटो व्हेरीफाय झालेले : ३५,१३२
- अर्ज मागे घेतलेले : २४६

पुण्यातील महाविद्यालये, प्रवेश क्षमता
नोंदणी केलेली महाविद्यालये : ३१०
एकूण क्षमता : १,०६,१४०
‘कॅप’अंतर्गत जागा : ८१,६९९
कोट्याअंतर्गत जागा : २४,४४१

तुमचे मत मांडा....
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्पा अद्याप सुरू झाला नाही. याबाबत तुम्हाला काय वाटते, हे आम्हाला तुमच्या नावासह कळवा. याविषयी तुमचे मत प्रतिक्रिया स्वरूपात ८४८४९७३६०२ या व्हॉटस्‌ॲप क्रमांकावर पाठवावे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26004 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top