डेंगीच्या संशयास्पद रुग्णांत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगीच्या संशयास्पद रुग्णांत वाढ
डेंगीच्या संशयास्पद रुग्णांत वाढ

डेंगीच्या संशयास्पद रुग्णांत वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : शहरात गेल्या आठवड्यापासून शहरात पाऊस पडत असल्याने पावसाळ्यातील आजार वाढले असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. डेंगीच्या संशयास्पद रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती त्यांनी दिली.
शहरात गेल्या आठवड्यापासून ताप, सर्दी, खोकला, घशाची खवखव, पोटदुखी अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. बाह्य रुग्ण विभागात येणारे बहुतांश रुग्ण याच तक्रारी घेऊन दवाखान्यात येत आहेत. डासांमुळे होणाऱ्या डेंगी, चिकुनगुणिया, हिवताप अशा किटकजन्य आजारांची लक्षणे दिसतात.
या बाबत डॉ. संतोष कदम म्हणाले, ‘‘शहरात या वर्षी वळवाचा पाऊस झाला नाही. त्यामुळे जूनपर्यंत उन्हाचा चटका कायम होता. त्यानंतर ढगाळ वातावरण झाले. मात्र, पाऊस नव्हता. आता गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरवात झाली आहे. अचानक बदलेल्या या वातावरणामुळे बहुतांश पुणेकर आजारी पडले आहेत. मात्र, काही रुग्णांना किटकजन्य आजारांची स्पष्ट लक्षणे दिसतात. त्यांना त्यासाठी रक्तचाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो.

डेंगीची ‘एनएस १‘ ही रक्तचाचणी पॉझिटिव्ह आली असल्यास त्याला संशयित रुग्ण म्हणतात. मात्र, ‘आयजीएम'' आणि ‘आयजीजी‘ या एलायझा पद्धत वापरून केलेल्या रक्त चाचण्या पॉझिटिव्ह असल्यास त्याला निश्चित डेंगी निदान म्हणतात. ‘एनएस१‘ या तुलनेत ‘आयजीएम'' आणि ‘आयजीजी‘ या चाचण्यांमध्ये नेमकेपणाने रोगनिदान होते. त्यामुळे ही चाचणी प्रमाण मानली आहे. अशी माहिती डॉ. परेश पोतदार यांनी दिली.
......
शहरात डेंगीचे संशयित रुग्ण वाढत आहेत. मात्र, त्या तुलनेत निश्चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. पावसाचे प्रमाण वाढेल त्या प्रमाणात डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असते. इमारतीची छत, टेरेस, परिसरातील पडलेल्या वस्तूंमध्ये पाणी साचून तेथे डासांची पैदास होते. त्यातून डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे डेंगीला रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य, पुणे महापालिका

ही काळजी घ्या
- इमारतीवरील पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकून ठेवा
- घराभोवती पावसाचे पाणी साठू देऊ नका
- परिसरातील पावसाच्या पाण्याची डबकी बुजवा किंवा ती वाहती करा
- घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा
- झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा
- पक्ष्यांसाठी ठेवलेले पाणी दररोज बदला
- सेप्टिक टँकच्या पाईपला जाळ्या बसवा
- कोणताही ताप अंकावर काढू नका, तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या
- आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा
-घरात साठवलेल्या पाण्यात डास अंडी घालणार नाहीत, अशा पद्धतीने झाकून ठेवा
- पाणी साचेल अशा वस्तू परिसरात साचू देऊ नका
- स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका

76581

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26066 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..