
ढसाळांनी सनातन प्रवृत्तीवर कोरडे ओढले :अरुण खोरे
पुणे, ता. ८ : ‘‘नामदेव ढसाळ हे एक वादळ होते. त्यांच्या कविता पारंपरिक कविता संकल्पनांच्या कानशिलात मारणाऱ्या होत्या. त्यांच्यावर कार्ल मार्क्स, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया यांचा प्रभाव होता. प्रस्थापित, परंपरावादी, सनातन प्रवृत्तीवर त्यांनी कोरडे ओढले. मात्र ढसाळांचे शब्द महाराष्ट्राला उशिरा कळले’’, असे मत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
रसिक मित्र मंडळातर्फे ‘एक कवी, एक भाषा’ उपक्रमांतर्गत ‘पद्मश्री नामदेव ढसाळ’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी रसिक मित्र मंडळाचे संस्थापक सुरेशचंद्र सुरतवाला होते. प्रदीप निफाडकर यांनी प्रास्ताविक केले. खोरे म्हणाले, ‘‘अमेरिकेतील ब्लॅक पॅंथरनंतर महाराष्ट्रात दलित पँथरची स्थापना झाली. त्या काळात दलितांवर अत्याचार वाढले होते. जागे झालेल्या दलित तरुणांमधून पँथरच्या छावण्या उभ्या राहिल्या. त्याच काळात दलित साहित्यिकांची पिढी आली होती. ‘गोलपीठा’ काव्यसंग्रहाचे भाषांतर तेव्हाच झाले असते, तर त्याला नोबेल पारितोषिक मिळाले असते.’’
महाराष्ट्रातील वर्चस्ववादी काँग्रेसी राजकारणात आमदारकीची संधी ढसाळांना मिळाली नाही. संसदीय राजकारणामुळे त्यांची कविता मागे राहिली, अशी खंतही खोरे यांनी व्यक्त केली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26110 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..