
'नेटकॉलिंगच्या त्रासापासून सुटका करा'पीडितांची मागणी; शिवीगाळ, अश्लील भाषेमुळे मानसिक त्रास
पुणे : नेटकॉलिंद्वारे केले जाणारे फोन आणि मोबाईल लोन ॲप, खासगी फायनान्स कंपन्या यांच्या फोन कॉलमुळे आम्ही अक्षरशः त्रस्त झालो आहोत. शिवीगाळ, अश्लील भाषेपासून ते अश्लील छायाचित्रे बनवून ते नातेवाइकांना पाठविण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर पोलिस कारवाई तरी केव्हा करणार? आणखी किती लोकांचा बळी घेणार? असे असंख्य प्रश्न महिला व इतर नागरिकांनी उपस्थित केले आहेत.
नेटकॉलिंग व मोबाईल लोन ॲपच्या माध्यमातून महिलांना फोन करून त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलण्यापासून ते महिलांचे फोटो, त्यांची वैयक्तिक माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यापर्यंत मजल गेली आहे. महिलांना लक्ष्य करून मानसिक त्रास देण्याच्या या प्रकाराबाबत शुक्रवारी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर महिलांसह सर्वसामान्य नागरिकांनीही त्यांना होणाऱ्या त्रासाची माहिती कळवीत आवाज उठविला. महिला व नागरिकांच्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे.
मलाही मागील चार महिन्यांपासून असे फोन कॉल येत आहेत. तसेच अश्लील पद्धतीने मॉर्फ केलेले माझे फोटो नातेवाइकांना पाठवून माझी बदनामी केली जात आहे. या प्रकारामुळे मी मानसिक तणावाखाली आले आहे. - नोकरदार महिला, हडपसर
मी कोणत्याही प्रकारचे लोन घेतलेले नाही, तरीही मला दररोज फोन कॉल येत आहेत. अशा फोन कॉलमुळे मी अक्षरशः वैतागले आहे. आमच्यासारख्या लोकांनी अशा प्रकाराबाबत नेमकी दाद मागायची तरी कोणाकडे?
- एक महिला
मीदेखील अशा कॉलमुळे खूप त्रस्त आहे. क्रेडिट कार्डच्या कॉल, लॉटरी लोन अशा सर्वांच्या फोन कॉलचा खूप त्रास होतो. दिवसातून पाच-सहा वेळा फोन आल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो.
- नामदेव मुंढे, खांदवेनगर, वाघोली
अश्लील कॉल, लोन, विमा, वेगवेगळ्या कंपन्या, एनजीओ, आर्थिक फसवणुकीशी संबंधित असे कॉल अजून किती वर्ष सहन करावे लागणार माहित नाही. त्यांच्यावर कडक कारवाईच होत नसल्याने त्यांना ब्लॉक करूनही उपयोग होत नाही. टेलिफोन रेग्युलॅरिटी ऑथोरिटीने कठोर नियम केले पाहिजेत. अन्यथा असले प्रकार सुरुच राहतील. अशा नाठाळांच्या माथी काठी मारण्याची वेळ आली आहे.
- जयवंत महाबोले
डू नॉट डिस्टर्ब ही सेवा सुरू असतानाही लोन ॲपचे फोन येतात कसे? दररोज १०-१२ फोन कॉल येतात. ते नंबर ब्लॉक केले तरीही दुसऱ्या मोबाईलवरून फोन येतात. रात्रपाळीत काम करणाऱ्या व्यक्तींना सकाळी आठ वाजल्यापासूनच कॉल येण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास होतो.
- कुणाल मेरगू
मला एका फायनान्स कंपनीचे कॉल सातत्याने येत असून, मी अक्षरशः त्रस्त झालो आहे. असे कॉल ब्लॉक केले तरी नवीन नंबरवरून दररोज कॉल येतच राहतात.
- भरत बिरादार, खराडी
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26405 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..