
प्रवाशांनी कारने गाठले हैदराबाद
पुणे, ता. ९ : मी माझ्या कुटुंबीयांसमवेत लोणावळा, मुंबई येथे फिरण्यास आलो होतो. फिरून झाल्यावर शुक्रवारी (ता. ८) रात्रीच्या विमानाने हैदराबादचे तिकीट काढले होते. त्यानुसार आम्ही सात वाजताच पुणे विमानतळावर दाखल झालो. चेकिंगचा सोपस्कार पार पडला. साडेनऊच्या विमानांची वाट पाहत बसलो. विमानाची वेळ उलटून गेल्यावर चौकशी केली. त्यावेळी साडे दहा अशी वेळ सांगण्यात आली. त्यानंतर आणखी उशीर लागेल असे सांगण्यात आले. अखेर रात्री १२ वाजता विमान रद्द झाल्याचे सांगून आम्ही तुमची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करू शकत नसल्याचे सांगितले. तेव्हा आम्ही पहाटे भाडेतत्वावर दोन कार करून हैदराबादला जायचे ठरविले. शनिवारी दुपारी आम्ही हैदराबादला पोहोचलो मात्र त्यासाठी आम्हाला ४५ हजार रुपयांचा खर्च आल्याचे प्रवासी लक्ष्मण रेड्डी यांनी सांगितले. हा सारा प्रकार पुणे विमानतळावर घडला.
पुणे विमानतळावरून शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता पुणे-हैदराबादला जाण्यासाठी एक फ्लाइट होते. पुण्याहून ४० प्रवासी या विमानाने प्रवास करणार होते. खराब हवामानाचा हवाला देत विमानांना उशीर होणार असल्याचे एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अचानक रात्री १२ वाजता विमानच रद्द झाल्याचे सांगत त्यांनी आपले हात वर केले. प्रवाशांनी डीजीसीएच्या नियमांचा हवाला देत संबंधित कंपनीकडे राहण्याची, जेवण्याची सोय करण्याची विनंती केली. मात्र एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जुमानले नाही. केवळ तिकिटाची रक्कम परत करू असे सांगितले. अन्यथा शनिवार रात्री हैदराबादला जाणाऱ्या विमानात तुमची सोय केली जाईल असे सांगितले. मात्र या प्रवाशांना थांबण्यासाठी कोणतीच व्यवस्था नव्हती. पहाटे चार वाजेपर्यंत प्रवासी अडकून पडले. काहींनी तिप्पट भाडे देऊन मुंबई - हैदराबादचे तिकीट काढले. तर काहींनी खासगी वाहनाने हैदराबाद गाठण्याचा निर्णय घेतला. संबंधित एअरलाईन्सने आपली जवाबदारी झटकत फसवणूक केल्याची भावना लक्ष्मण रेड्डी व्यक्त केली. या बाबत डीजीसीएकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26434 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..