अमरनाथ यात्रेला गेलेल्या पुण्यातील दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमरनाथ यात्रेला गेलेल्या पुण्यातील दोघांचा मृत्यू
अमरनाथ यात्रेला गेलेल्या पुण्यातील दोघांचा मृत्यू

अमरनाथ यात्रेला गेलेल्या पुण्यातील दोघांचा मृत्यू

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अमरनाथ यात्रेला गेलेल्या दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पुरुष आणि एका महिला भाविकाचा समावेश आहे. या दोनपैकी पुरुष भाविक हा पिंपरी-चिंचवड, तर महिला भाविक या पुणे शहरातील आहेत. अमरनाथ यात्रेला गेलेले जिल्ह्यातील अन्य सर्व भाविक सुखरूप असून, रविवारी (ता. १०) ते परतीचा प्रवास सुरू करणार आहेत, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड येथील मृत भाविकाचे नाव प्रदीप नाथा खराडे असून ते गजानन महाराज खेडेकर यांचेसोबत अमरनाथ यात्रेला गेले होते. खेडेकर यांच्यासोबत एकूण २०० भाविक होते. हे सर्वजण गुरुकृपा ट्रॅव्हलमार्फत चार खासगी बसने अमरनाथ यात्रेला गेले होते. खराडे यांना शुक्रवारी (ता.८) मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार चालू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून पुण्याकडे आणण्यात येत आहे. ही रुग्णवाहिका सोमवारी (ता.११) पुण्यात पोचणार आहे. खेडेकर यांच्यासोबत गेलेले अन्य सर्व भाविक सुखरूप असून, सध्या ते बलताल बेस कॅंपमध्ये आहेत. हे भाविक रविवारी परतीचा प्रवास सुरू करणार आहेत.

दरम्यान, देहू फाटा (आळंदी) येथील गजानन (अजय) महाराज सोनवणे यांच्या माउली यात्रेसोबत ५५ भाविक अमरनाथला गेलेले आहेत. यापैकी वडगाव बुद्रूक येथील सुनीता महेश भोसले यांचा मृत्यू झाला, त्यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने जम्मूला नेले आहे. त्यांच्या पार्थिवासोबत पती महेश भोसले आणि नणंद प्रेमा शिंदे आहेत.

आळंदीतील अन्य भाविक सुखरूप
पुणे जिल्ह्यातून दोन विविध यात्रा कंपनीच्या माध्यमातून अमरनाथ यात्रेला गेलेल्या २५५ यात्रेकरूंपैकी आळंदीतील भाविकांसह अन्य सर्व भाविक सुखरूप आहेत. जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ धाम येथे ढगफुटीच्या घटनेनंतर यात्रेकरूंच्या अनेक तुकड्या अडकल्या होत्या. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सर्व काही सामान्य होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळची आरती संपताच डोंगराच्या माथ्यावर मोठा आवाज झाला. विजांचा कडकडाट झाला. पवित्र गुहेजवळ ढग फुटले होते. यामुळे अचानक घबराटीचे वातावरण निर्माण झाले. लोकांना काही समजेपर्यंत डोंगरावरून वादळी वेगाने खाली पाणी येऊ लागले. अचानक ढगफुटी झाल्याने अनेक भाविक बेपत्ता झाले. यापैकी आळंदीतील दोन महिला भाविकांचा शनिवारी (ता. ९) दुपारपर्यंत संपर्क होत नव्हता. परिणामी कुंटुबीय काळजीत होते. पण दुपारी चारनंतर दोघी सुखरूप असल्याची माहिती आळंदी पोलिसांना यात्रा कंपनीच्या संचालकांनी दिली आहे.

धायरीतील महिलेचाही मृत्यू
धायरी : अमरनाथ येथील ढगफुटीत पुण्यातील धायरी येथील सुनीता भोसले (वय ५२, रा. गल्ली क्रमांक १७, फॉर्चुन सोसायटी, रायकारनगर, धायरी) या महिलेचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळताना काही दगड डोक्यावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दुर्घटनेच्या १५ मिनिटांपूर्वी त्यांचे पुण्यात असलेल्या आपल्या मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26447 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..