पुण्यात राज्यातील ३५ टक्के कोरोनाचे सक्रिय रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात राज्यातील ३५ टक्के कोरोनाचे सक्रिय रुग्ण
पुण्यात राज्यातील ३५ टक्के कोरोनाचे सक्रिय रुग्ण

पुण्यात राज्यातील ३५ टक्के कोरोनाचे सक्रिय रुग्ण

sakal_logo
By

पुणे, ता. १० : राज्यातील सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. सलग पाच दिवसांपासून मुंबईला मागे टाकून पुण्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. सध्या राज्यातील ३५ टक्के सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याचे निरीक्षण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने नोंदविले आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या महिन्यापासून पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र, यात बहुतांश रुग्ण घरातच औषधे घेऊन बरे होत आहेत. उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. सहव्याधी किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये कोरोनामुळे गुंतागुंत वाढताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रकाश शिंदे यांनी दिली.

कोरोनाचा स्थानिक उद्रेक
राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा स्थानिक उद्रेक आपल्याला दिसत आहे. त्याची सुरवात राज्याची राजधानी असलेल्या मुंबई आणि पाठोपाठ ठाण्यामध्ये झाली. हा स्थानिक उद्रेक दिसत होता. आता हा उद्रेक मुंबई आणि ठाण्यापासून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरकत आहे. त्याचवेळी मुंबई, ठाणे आणि रायगड या भागात महिन्याभरापूर्वी वाढलेल्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे निरीक्षणही आरोग्य खात्याने नोंदविले.

इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाची वाढ
राज्यात गेल्या आठवड्यात १७ टक्क्यांनी कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले होते. त्याचवेळी पुण्यात ४० टक्क्यांनी हे प्रमाण वाढले होते. कोरोनाची वाढ यापूर्वी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या भागांपुरती मर्यादित होती. ती आता पुणे, औरंगाबाद, जालना, अकोला, नागपूर या भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

पुण्याची सद्यःस्थिती
पुण्यात मुंबईच्या तुलनेत उशिरा रुग्णांची संख्या वाढू लागली. मुंबईमध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पुण्यात ती वाढ अत्यल्प होती. आता मुंबईनंतर एक महिन्यांनी पुण्यात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या उशिरा कमी होताना होईल, असेही डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले.

पालखी सोहळ्याचा परिणाम
राज्यात दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी झाली नव्हती. यावर्षी वारी झाली. लाखो भाविक पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरला पोचले. तेथून पुढे हे वारकरी पुन्हा आपापल्या गावी जातील, त्या वेळी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली दिसेल, अशी शक्यताही सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी

व्यक्त केली.

राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या काही अंशी वाढलेली दिसण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येने नागरिक एका भागातून दुसऱ्या भागात जात असल्याने त्यांच्याबरोबर या विषाणूंचा प्रसार होतो.
- डॉ. प्रदीप आवटे,
साथरोग सर्वेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र

असे वाढले सक्रिय रुग्ण
तारीख .... मुंबई ...... पुणे ........ ठाणे
५ जुलै .... ६४०९ .... ५३३५ ..... ४०३७
६ जुलै .... ५६०० .... ५७५० ..... ३३८४
७ जुलै .... ४८७५ .... ६०७९ ..... ३१३१
८ जुलै .... ४४२७ .... ६१९७ ..... २८२९
९ जुलै .... ४११५ .... ६३७१ ..... २५१२
१० जुलै .. ३७५३ .... ६४७० ..... २२५९

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26676 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..