
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर पुणे स्टेशन बस स्थानकातील चित्र; चोरांचा वावर वाढला
पुणे. ता. ११ : पुणे स्टेशन परिसरातील एसटी बसस्थानकात चोरांचा वावर वाढला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली असली, तरीही त्याचा कोणताच फायदा प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने होताना दिसून येत नाही.
प्रवाशांच्या बॅग, मोबाईल आदी प्रकारच्या चोरीच्या घटनेत वाढ झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस व एसटी प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. बस स्थानकात काही अनोळखी व्यक्ती दिवस व रात्र बसून राहतात. एकमेका सोबत भांडणे करतात. यातून ते प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. यातच काही टॅक्सीचालक बस स्थानकात येऊन प्रवाशांना खासगी बसने प्रवास करण्याची गळ घालतात. त्यामुळे एसटी प्रवाशांची संख्या देखील घटत आहे. तसेच स्वछतागृहातील पाण्याची नळे बंद आहेत. तर काहींची तोट्या तुटलेल्या. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.
मद्याच्या बाटल्यांचा खच
बस स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. दारुडे, गर्दुले रात्रीच्या वेळी हा उद्योग करीत असल्याचे काही एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणांत चिखल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.
बस स्थानकात नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्या येथे आढळून येत आहेत. कधी गर्दुले, तर कधी चोरटे यांचा येथे मोठ्या प्रमाणात वावर आहे. यामुळे प्रवासी सुरक्षितता धोक्यात आली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.
चेतन पुणेकर, प्रवासी.
बस स्थानकात एसटी वाहतूक रात्री अकरापर्यंत सुरु असते. दुपारी व रात्री सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. परिसरात अशा घटना घडत असतील, तर नक्कीच त्या थांबविल्या जातील. प्रवासी सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल.
-ज्ञाणेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j26999 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..