शहरभर वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरभर वाहतूक कोंडी
शहरभर वाहतूक कोंडी

शहरभर वाहतूक कोंडी

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः शाळा, महाविद्यालये, नोकरीला जाण्याच्या वेळेलाच बुधवारी सकाळी जोरदार पाऊस झाल्याने अनेक नागरीकांना विस्कळित झालेल्या वाहतुकीचा चांगलाच फटका बसला. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावली. त्यातच नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने भिडे पूलही वाहतुकीसाठी बंद केला. त्यामुळे वाहनचालकांना आणखीनच त्रासाला सामोरे जावे लागले.
शहरात मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. अगोदरच खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे वाहनचालकांवर वाहने संथगतीने चालविण्याची वेळ आली. मुख्य रस्ते, चौकांमधील सिग्नल यंत्रणा बंद ठेवून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमन करण्यावर भर दिला जात होता. मात्र पाऊस, खड्डे व मोठ्या संख्येने रस्त्यावर आलेली चारचाकी वाहने, ठिकठिकाणी रस्त्यांवर साठलेले पाणी यामुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडत गेली. अनेकजण नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा ते एक तास विलंबाने कामाच्या ठिकाणी पोचले. मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे अनेक चालकांनी अंतर्गत रस्त्यांवरून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथेही त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास डेक्कन येथील नदीपात्रातील भिडे पूल पाण्याखाली गेल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करावा लागला. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच कोथरूड, कर्वेनगर, गोखलेनगरहून नारायण पेठेकडे येणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडाली. वाहनचालकांना खंडोजीबाबा चौक, म्हात्रे पूल, लाल बहादुरशास्त्री रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर परिसराकडून पेठांमध्ये जाण्याची वेळ आली. त्यामुळे आपटे रस्ता, जंगली महाराज रस्ता परिसरातील वाहतूक मंदावली.
धरणातून पाणी सोडल्यानंतर नदीपात्रातील रस्ता वाहतुकीस बंद केला. त्यामुळे मध्यभागातील केळकर रस्त्यावरील वाहतूक विस्कळित झाली. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यानेही वाहनांचा वेग मंदावला. परिणामी लाल बहादूर शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, शंकरशेठ रस्ता, स्वारगेट, कर्वे रस्ता, पुणे-सातारा रस्ता या परिसरामध्येही वाहतूक विस्कळित झाली होती.

मी शनिवार पेठेमधील एका सराफी दुकानामध्ये नोकरीला आहे. दररोज
एसएनडीटी, नळस्टॉप, रजपूत झोपडपट्टी, डेक्कन नदीपात्रातून भिडे पुलमार्गे शनिवार पेठेत पोचते. दररोज अर्धा तास लागतो. मात्र बुधवारी सकाळी वाहतूक कोंडीमुळे मला एक तासापेक्षा जास्त वेळ लागल्याने अक्षरशः त्रस्त झाले होते.
- कल्पना जाधव, कोथरूड

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27659 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top