
‘शताब्दी’ १० ऑगस्टपासून ट्रॅकवर
पुणे, ता. १३ ः गेल्या दोन-अडीच वर्षांपासून यार्डमध्ये मुक्काम करीत असलेली पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस १० ऑगस्टपासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या भेटीला येत आहे. रेल्वे बोर्डाने पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळेच पुणे विभाग आता शताब्दीचा रेक तयार करण्याच्या कामाला लागला आहे. तिच्या वेळेत आणि गतीमध्ये मात्र थोडासा बदल झाला आहे. ही रेल्वे पुणे स्थानकावरून सकाळी सहा वाजता सुटेल.
मध्य रेल्वेची एकमेव असलेली शताब्दी एक्स्प्रेस पुणे-सिकंदराबाद दरम्यान १० ऑगस्टपासून धावण्यास सज्ज होत आहे. आता तिच्या वेळेत दहा मिनिटांचा बदल झाला आहे. याशिवाय, पुणे ते सिकंदराबाद दरम्यान रेल्वे ट्रॅक काही सेक्शनमध्ये १३० किलोमीटर वेगासाठी फिट केला आहे. त्याचा थेट फायदा प्रवाशांना येणाऱ्या काळात होईल.
अडीच वर्षांपासून रेक धूळखात
शताब्दी एक्स्प्रेसचा रेक यार्डसह विविध भागात धूळखात पडला आहे. सध्या तो पुणे-मिरज मार्गावरच्या वल्हा स्थानकाच्या लूप लाइनवर ठेवला आहे. यात दोन इकॉनॉमी कोच आहेत, उर्वरित सर्व कोच सीसी असणार आहेत. सध्या पुणे विभाग डब्यांची जुळवाजुळव करीत आहे. सोलापूर, कलबुर्गीसह (गुलबर्गा) वाडी, तांडूर, विकाराबाद, बेगमपेठ या स्थानकांवर थांबा असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.
विस्टाडोम कोच असणार
प्रवाशांना गाडीत बसून निसर्गसौंदर्य पाहता यावे म्हणून विस्टाडोम या डब्यांची निर्मिती केली आहे. याच्या मोठ्या काचातून प्रवाशांना निसर्गसौंदर्य पाहता येईल. सध्या हा डबा पुणे ते मुंबई धावणार आहे. डेक्कन व डेक्कन क्विन एक्स्प्रेसला हा डबा जोडण्यात आला आहे. शताब्दीला पहिल्यांदाच हा डबा जोडण्यात येत आहे.
‘‘शताब्दी एक्स्प्रेस सुरू होत आहे, ही प्रवाशांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. याआधीच ही रेल्वे सुरू होणे गरजेचे होते. यामुळे प्रवाशांना एका दिवसांत हैदराबादला जाऊन येणे शक्य होणार आहे.’’
- हर्षा शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप, अध्यक्षा
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27707 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..