पुणेकर धरू लागले ढोल-ताशांचा ठेका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकर धरू लागले
ढोल-ताशांचा ठेका
पुणेकर धरू लागले ढोल-ताशांचा ठेका

पुणेकर धरू लागले ढोल-ताशांचा ठेका

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : गणेशोत्सव म्हटलं की ढोल ताशांचा गजर आलाच. गतवर्षी कोरोनामुळे सार्वजनिक मिरवणुकांवर बंदी होती. त्यामुळे उत्सवावरही मर्यादा आल्या होत्या. सध्या दैनंदिन जीवन सुरळीत सुरू असून, वादनालाही परवानगी आहे. त्यामुळे उत्सवप्रेमी यंदाचा गणेशोत्सव अधिक जल्लोषात साजरा करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही ढोल ताशा पथकांशी संपर्क साधला. या पथकांपैकी नूमवी ट्रस्ट वाद्य पथकाची तीन जुलैपासून ओंकारेश्वर मंदिरजवळ नदी पात्रात तयारी सुरू झाली आहे. पथकामध्ये ६५० वादकप्रेमींचा सहभाग असून, त्यामध्ये २८० मुलींचा समावेश आहे. पथकात काही व्यावसायिक, आयटी क्षेत्रातील, डॉक्टर, इंजिनिअर, विद्यार्थी आहेत. वेगवेगळी जबाबदारी पेलत ते ढोल पथकासाठी वेळ काढतात. कामाचा ताण हलका करणारे ढोल पथक आमच्यासाठी आनंदाचा ठेवा आहे, असे ते सांगतात.

ढोलवादनातून नवचैतन्य
पुण्यासोबतच लोणावळा, तळेगाव दाभाडे, मोशी, पानशेत, चाले अशा विविध ठिकाणांवरून पथकात ढोल ताशा प्रेमी येतात. ढोलवादनातून एक नवचैतन्य निर्माण होते. यंदा ही ऊर्जा उत्सवप्रेमींसोबत बाप्पापर्यंत पोचावी, यासाठी पथकांचे प्रयत्न सुरू आहेत.

गजर, दीड हात, १ ते ६ हात, गावठी, करमोळी, भांगडा, प्रसिद्ध, ताल, इडली वडा, ढोली बाजा, कडक लक्ष्मी, संबळ, मोरया, रेलगाडी, लावणी अशा ताली यंदाच्या उत्सवात सादर करण्यात येणार आहेत. दोन वर्षानंतर पुन्हा वादन करायला मिळणार आहे याचा जास्त आनंद आहे. दोन वर्षांची कसर यंदाच्या गणेशोत्सवात भरून काढू.
- यज्ञेश मुंडलिक, अध्यक्ष, नूमवी ट्रस्ट पथक

सर्व क्षेत्रामध्ये महिला ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. त्याचप्रमाणे ती महिला पथकात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, ढोलाला ढोल लावून तितक्याच ताकदीने वादन करू शकते.
- नेहा घाटगे, वादक, नूमवी ट्रस्ट पथक

रमणबाग युवा मंच ट्रस्ट या पथकाचा सराव ३० जुलैपासून सुरू होणार आहे. पथकामध्ये ६०० नवीन, जुन्या वादकप्रेमींचा सहभाग आहे. पुण्यातील पाच मानाच्या गणपतींपैकी, पहिला मानाचा कसबा गणपतीसाठी हे पथक वादन करत आले आहे. यंदाच्या उत्सवात पारंपरिक ठेक्यासोबतच नवीन बदल करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आपली संस्कृती जपत पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरे करतानाचा उत्साह ध्वज, बर्ची, टिपरी घेऊन ढोल ताशांच्या निनादात बाप्पाचे आगमन आणि विसर्जन करणे हे आद्य कर्तव्य आहे. उत्सव पुन्हा उत्साहात साजरा करता येणार, याचा प्रत्येक गणेशभक्ताला आनंद आहे.
- गणेश गुंड (पाटील), ताशा वादक, रमणबाग युवा मंच ट्रस्ट

नादब्रह्म ढोलताशा ध्वज पथकाचा सराव २६ जूनपासून छत्रपती राजाराम पुलाजवळ सुरू आहे. पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ, या गणपतीसाठी हे पथक वादन करत आले आहे. जुने व नवीन वादकांची संख्या मिळून ५५० इतकी आहे. दहा दिवसांमध्ये विविध ठिकाणी वादन होते. अभिनेता सलमान खानच्या घरच्या गणपतीसाठी पथक मुंबईला जाऊन वादन करते. उत्सवासाठी वादकांचा सहभाग वाढला आहे.
- आनंद खंडेलवाल, सचिव, नादब्रह्म ढोलताशा ध्वज पथक ट्रस्ट

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28191 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..