
९१ टक्के ग्राहकांचे प्राधान्य ऑनलाइन व्यवहारांना कोरोनाकाळापासून लागलेली सवय आता बनली जीवनशैली
पुणे, ता. १५ : कोरोना सुरू झाल्यानंतर जास्तीत जास्त स्पर्शविरहित कामकाज करण्यावर भर देण्यात आला. तेव्हापासून लागलेली ही सवय आता अनेकांची जीवनशैली बनली आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढलेले ऑनलाइन पेमेंट. त्यामुळेच सध्या देशातील ९१ टक्के ग्राहकांची आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाइन पेमेंट पद्धतींना पसंती असल्याचे एका सर्व्हेतून समोर आले आहे.
ऑनलाइन व्यवहारांची सवय वाढल्याने देशातील मोबाईल वॉलेट्ससारख्या डिजिटल पेमेंट्सचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे. मात्र या व्यवहारांत आपली फसवणूक होर्इल का?, आपली गोपनीय माहिती चोरली जाणार नाही ना? किंवा खात्यातून पैसे तर चोरले जाणार नाहीत ना, अशी भीतीदेखील व्यक्त केली जात आहे. भारतासह ग्रेट ब्रिटन, अमेरिका आणि आशिया खंडातील इतर काही देश अशा २० देशांमधील सहा हजार ग्राहक आणि दोन हजार व्यवसाय यांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. ग्राहक व व्यवसायांचे आर्थिक दृष्टिकोन, आर्थिक स्वास्थ्य, ऑनलाइन वर्तन आणि अशा काही मुद्द्यांवर सर्वेक्षणात माहिती जमा करण्यात आली. गेल्या सात वर्षांतील ग्राहकांच्या डिजिटल प्राधान्यांमधील स्थित्यंतरे व व्यवसायांच्या व्यूहरचना यांचा शोध घेण्यासाठी ‘एक्सपीरियन’ या संस्थेने हा सर्व्हे केला होता.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४५ टक्के भारतीय ग्राहकांनी फसवणूक व वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय, आपल्या माहितीचे फसवणूक करणाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी व्यवसायांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा ८० टक्के ग्राहकांनी व्यक्त केली.
सर्व्हेतील महत्त्वाचे मुद्दे :
- देशात भारतात एआय-पॉवर्ड चॅटबॉट्स व व्हर्च्युअल असिस्टंटचा वापर वाढत आहे
- ३४ टक्के ग्राहकांचा मानवी सहायकांहून अधिक विश्वास ‘एआय’वर आहे
- ६८ टक्के ग्राहक डिजिटल व्यवहारांसाठी आपली संपर्क माहिती, पत्ता, संपर्क क्रमांक आदी वैयक्तिक डेटा शेअर करण्यास तयार
- ५८ टक्के ग्राहकांनी बँकखात्यांचे तपशील, क्रेडिट कार्डाचे तपशील यासारखा वित्तीय डेटा संरक्षित करण्यावर प्रकाश टाकला
- ६० टक्के ग्राहकांनी बनावट/फसव्या ईमेल, मेसेजेस् किंवा फोन घोटाळ्यांबाबत चिंता व्यक्त केली.
- ३० टक्के ग्राहकांनी सायबर क्राइमला बळी पडल्याचे नमूद केले
- २९ टक्के भारतीय ग्राहकांचे क्रेडिट कार्ड/पेमेंट तपशील चोरीला गेले
- ऑनलाइन व्यवहारांमध्ये सुरक्षितता (९२ टक्के) आणि खासगीत्व (९२ टक्के) हे मुद्दे कायमस्वरूपी महत्त्वाचे आहेत.
बीएनपीएलला मिळतेय पसंती :
बाय नाऊ पे लेटर किंवा बुक नाऊ पे लेटर (बीएनपीएल) सेवांचे आकर्षण देशात वाढत आहे. गेल्या सहा महिन्यांत बीएनपीएल सेवांचा वापर जगभरात सुमारे १८ टक्के वाढला आहे. देशात ही टक्केवारी २१ टक्के होती. या व्यवहारात व्यवसायांनी योग्य पद्धतींचे पालन करावे आणि नियामक निर्देशांची पूर्तता करणे यासाठी आवश्यक आहे, असे सर्व्हेत नमूद आहे.
भारत एका मजबूत डिजिटल परिसंस्थेच्या उभारणीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या परिसंस्थेत ग्राहक डिजिटल सेवा वापरून त्यांच्या आर्थिक बाबींचे प्रभावी व्यवस्थापन करू शकतात. व्यवसायांनी तंत्रज्ञान व नवोन्मेषाचा मोठ्या प्रमाणावर अंगीकार करताना, ग्राहकांच्या सातत्याने बदलणाऱ्या मागण्यांचा विचार करणे आवश्यक आहे. सुरक्षित डिजिटल अनुभवामुळे ग्राहकांचा विश्वास व निष्ठा मिळविण्यास मदत होईल.
- नीरज धवन, व्यवस्थापक, एक्सपीरियन
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28255 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..