
‘एनआयआरएफ’च्या क्रमवारीत आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रॅंकिंगमध्ये घसरण
पुणे, ता. १५ : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे नॅशनल इस्टिट्युशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) जाहीर झाले असून, या रॅंकिंगमध्ये मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) देशात तिसऱ्या स्थानावर आहे. तर पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ २५ व्या, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर) २६ व्या स्थानावर आहे. देशातील शिक्षणसंस्थांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठाच्या रॅंकिंगमध्ये सलग पाचव्यावर्षी घसरण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे ‘एनआयआरएफ रॅंकिंग’ शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्थांच्या ‘टॉप शंभर’च्या यादीत राज्यातील १२ शिक्षणसंस्था असून, त्यात पुण्यातील चार आणि मुंबईमधील सहा संस्थांचा समावेश आहे. तर देशातील विद्यापीठांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १२ व्या क्रमांकावर असून, या क्रमवारीतही विद्यापीठाचे रॅंकिंग सलग तिसऱ्यावर्षी घसरल्याचे दिसून आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्ट संस्थांच्या रॅंकिंगमध्ये २०२१ मध्ये २० व्या, तर विद्यापीठांच्या रॅंकिंगमध्ये ११ व्या स्थानावर होते.
ही क्रमवारी ठरविताना देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, अभियांत्रिकी, महाविद्यालये, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, दंत वैद्यकीय, विधी, आर्किटेक्चर असे एकूण ११ गट निश्चित केले आहेत. हा दर्जा ठरविण्यासाठी संशोधन, सर्वसमावेशकता, पदवीधर विद्यार्थ्यांचे निकाल, संख्या आणि शिकविणे, शिकणे आणि संसाधने असे काही निकष ठरविले आहेत. त्याआधारे ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. यामध्ये तिसऱ्या स्थानावरील आयआयटी, मुंबईचा स्कोअर ८२.३५ इतका आहे. तर २५ व्या स्थानावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा असून विद्यापीठाचा स्कोअर ५६.९९ आहे.
‘टॉप १००’मध्ये असणाऱ्या राज्यातील संस्था :
शिक्षण संस्था : क्रमवारी (आकड्यात)
- भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई : ३
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : २५
- भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसर), पुणे : २६
- इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (मुंबई) : २८
- होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई : ३३
- सिंबायोसिस इंटरनॅशनल, पुणे : ६२
- विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर : ६८
- डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे : ७६
- मुंबई विद्यापीठ : ८१
- एसव्हीकेएमज् नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्, मुंबई : ८९
- दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा : ९२
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई : ९९
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गेल्या काही वर्षातील रॅंकिंग (आकड्यात) :
वर्ष : देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ
२०२२ : २५ : १२
२०२१ : २० : ११
२०२० : १९ : ९
२०१९ : १७ : १०
२०१८ : १६ : ९
पुण्यातील ‘आयसर’चे काही वर्षांतील रॅंकिंग :
वर्ष : देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्था : देशातील संशोधन संस्था
२०२२ : २६ : १७
२०२१ : २४ : १६
२०२० : २५ : --
२०१९ : २३ : --
‘एनआयआरएफ’ रॅंकिंगमध्ये पुण्यातील संस्थांचे विविध गटांमधील रॅंकिंग :
(संबंधित गटात पहिल्या १०० क्रमांकात असणाऱ्या संस्था)
गट : पुण्यातील संस्था (रॅंकिंग/क्रमवारी)
- महाविद्यालये : फर्ग्युसन महाविद्यालय (रँक ५७)
- अभियांत्रिकी : डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी (रँक :७१), कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग -सीओईपी (रँक :७२)
- व्यवस्थापन : सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (रँक : १७), पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (रँक : ९१)
- औषधनिर्माणशास्त्र : पूना कॉलेज ऑफ फार्मसी (रँक : २१), डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च (रँक ४१), एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी (रँक : ७६), डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटी (रँक : ८७), मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसी (रँक : ९०)
- वैद्यकीय : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (रँक : १७)
- दंत वैद्यकीय : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (रँक : ३)
- विधी : सिंबायोसिस लॉ स्कूल (रँक : ३)
विद्यापीठांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बाराव्या स्थानावर असले तरीही सार्वजनिक विद्यापीठ स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोनामुळे राज्याबाहेरील व परदेशी विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने, तसेच विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर हलल्याने एकत्रित गुणांमध्ये फरक पडलेला दिसतो. परंतु पुढच्या काळात आणखी चांगली कामगिरी करू.
- डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
एनआयआरएफ रॅंकिंगमध्ये सार्वजनिक विद्यापीठात राज्यातील प्रथम स्थान अढळ आहे. मात्र राज्य विद्यापीठ म्हणून आपल्या काही मर्यादा असल्याने परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. आपल्याकडे मंजूर शिक्षक ३६८ असून, त्यातील ५० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे भविष्यात आपले स्थान कायम ठेवायचे असेल, तर राज्य सरकारचे सहकार्य गरजेचे आहे.
- डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28307 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..