Maharashtra Rain : हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ का फसला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IMD Weather Alert
..म्हणून हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ फसला?

Maharashtra Rain : हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ का फसला?

पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. १३) आणि गुरुवारी (ता. १४) रेड अलर्ट दिला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुटीही जाहीर केली. आपत्कालीन विभागही सज्ज झाला. मात्र बुधवारी जोरदार पडणाऱ्या पावसाने गुरुवारी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रेड अलर्ट देण्यामागे हवामान खात्याची तांत्रिक चूक होती की तज्ज्ञांचे आकलनच चुकले, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. त्याचेच उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न...

हवामान खात्याचा अंदाज नक्की काय होता?
बुधवारी सर्वदूर मुसळधार पाऊस (६४.५ ते ११५.५ मिलिमीटर), घाटमाथ्यावर तीव्र मुसळधार पावसाची (११५.६ ते २०४ मिमी) शक्यता वर्तविण्यात आली होती. तर गुरुवारी बहुतेक ठिकाणी मध्यम पाऊस (१५.६ ते ६४.४ मिमी) तर काही ठिकाणी एक-दोन तीव्र सरी पडण्याची शक्यता होती. त्यामुळे बुधवारी घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर पुणे शहरात यलो अलर्ट देण्यात आला होता.

हेही वाचा: सहकारी निवडणुकांना राज्यात पावसामुळे ब्रेक

अलर्ट देण्यामागची कारणे?
कोकण किनारपट्टीलगत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोरदार प्रवाह, ओरिसाच्या दक्षिण किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा. अशा वातावरणीय बदलात कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता असते. त्यामुळे काही जिल्ह्यांत रेड अलर्ट देण्यात आला होता.

नक्की काय घडले?
शहरात बुधवारी (ता. १३) दिवसभर सरासरी ५० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. मात्र गुरुवारी (ता. १४) पावसाचे प्रमाण फारच कमी होते. सरासरी ९.४ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील रेड अलर्टमुळे प्रशासनाने शाळांना सुटी दिली. तर काही आस्थापने आणि कंपन्याही बंद होत्या.

अंदाज चुकला का?
हवामान खात्याचा अंदाज चुकला असे थेट म्हणता येत नाही. पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट हा घाटमाथ्यासाठी असतो. शहरात मात्र बुधवारी यलो अलर्ट (मुसळधार पाऊस) देण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुटीही जाहीर केली होती. प्रथमदर्शनी जरी हवामानखात्याचा अंदाज बरोबर असला तरी, त्यात अधिक अचूकतेची गरज आहे. असे मत हवामानतज्ज्ञ व्यक्त करतात. याबद्दल ज्येष्ठ हवामानशास्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणतात, ‘‘उत्तर भारतातही अजून जोरदार पाऊस नाही. त्यामुळे तिकडून कोरडे वारे येत आहेत. कमी दाबाचे क्षेत्र जरी तयार झाले तरी उत्तरेकडून येणारे कोरडे वारे मिसळले की त्याची तीव्रता कमी होते. सध्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी जे मॉडेल वापरले जाते. त्यामध्ये अशा कोरड्या वाऱ्यांचा किंवा एरोसोलच्या प्रभावाचा सविस्तर अंतर्भाव नाही. पर्यायाने काही वेळा अंदाज फसू शकतात.’’

हेही वाचा: हवामान बदलाचा प्रवाळांवरील परिणाम तपासणार

हवामान खाते काय म्हणते?
पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट म्हटलं तर तो बहुधा घाटमाथ्यासाठीच असतो. कुलाबा वेधशाळा त्यासंबंधी स्पष्टपणे सांगते, अशी माहिती पुण्यातील हवामान विभागाचे शास्रज्ञ आणि अंदाज प्रमुख डॉ. अनुपम काश्यपि यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘पुणे शहरात बुधवारी मुसळधार तर गुरुवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली होती. तसाच पाऊस पडला. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी शाळा बंद ठेवल्या होत्या. पुणे शहरासाठी कधीच रेड अलर्ट नव्हता, फक्त एका दिवसासाठी यलो अलर्ट होता. आम्ही अचूकच अंदाज वर्तवला होता.’’

रेड अलर्ट म्हटलं की लोकांना २६ जुलै २००५ ची आठवण होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरते. भारत हा उष्णकटिबंधीय क्षेत्रात आहे. त्यामुळे हवेच्या चलन-वलनात अचूकता नाही. त्यातही आपण जे मॉडेलिंग वापरतो ते भारतात तयार केलेले नाही. त्यामुळे हवामान अंदाज हे ढोबळमानाने दिलेले असतात.
- डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ हवामानशास्त्र

अशी ओळखा पावसाची श्रेणी ः
शब्दावली ः पाऊस (मिमी)
खूप हलका पाऊस ः २.४ पर्यंत
हलका पाऊस ः २.५ ते १५.५
मध्यम पाऊस ः १५.६ ते ६४.३
मुसळधार पाऊस ः ६४.५ ते ११५.५
खूप मुसळधार पाऊस ः ११५.६ ते २०४.४
अतिवृष्टी ः २०४.५ पेक्षा जास्त

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28604 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top