
कोरोनानंतरच्या ‘लंग्ज डॅमेज’वर स्टेमसेल्सचा उपाय हिरड्यांतील पेशींचा उंदरांवरील प्रयोग यशस्वी; विद्यापीठाच्या ‘आयबीबी’चे संशोधन
पुणे, ता. १६ : मानवी फुफ्फुसावर थेट हल्ला करणाऱ्या कोरोना विषाणूंमुळे काही रुग्णांना लंग्ज डॅमेजचा सामना करावा लागत आहे. आता हे लंग्ज डॅमेज भरून काढण्यासाठी भारतीय शास्रज्ञांनी हिरड्यांतील स्टेमसेल्सचा पर्याय सुचविला असून, त्यासंबंधीच्या उंदरांवरील चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत.
कोरोनानंतर रुग्णांमध्ये बराच कालावधीपर्यंत फुफ्फुसाशी संबंधित समस्या जाणवतात. विषाणूंमुळे नष्ट झालेल्या पेशींच्या पुनरुज्जीवनासाठी अजूनही प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध नाही. अशातच पुण्यातील शास्रज्ञांचे हे संशोधन जगासाठी दिशादर्शक ठरणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जैवमाहितीशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान संस्थेच्या (आयबीबी) शास्रज्ञांचे हे संशोधन ‘सायन्स ॲडव्हान्स’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. आयबीबीच्या डॉ. गीतांजली तोमर यांच्या नेतृत्वात जय दवे, सायली चांदेकर, कौशिक देसाई, प्रज्ञा साळवे, नेहा सपकाळ, सुहास म्हस्के, अंकुश देवळे, पराग पोकरे यांच्यासह राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेचे डॉ. शुभनाथ बेहरा यांनी हे संशोधन केले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. अजय जोग, दिल्लीतील एम्सचे डॉ. रूपेश श्रीवास्तव आणि परभणीच्या सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाचे डॉ. पंकज चिवटे यांचाही संशोधनात सहभाग आहे.
स्टेमसेल्स म्हणजे काय?
शरीरातील मूळ पेशी ज्या कोणत्याही प्रकारच्या नवीन पेशी निर्माण करण्यास सक्षम असतात. स्टेम सेल हे प्रसुतीच्या वेळी मातेच्या गर्भनाळेतून तसंच रक्त किंवा अस्थिमज्जा (बोनमॅरो)मधून प्राप्त करता येतात.
असे झाले संशोधन
- विविध वयोगटांतील व्यक्तींच्या हिरड्यांतील स्टेमसेल्स मिळविण्यात आल्या
- यात वय १३ ते ३१ वर्षाचे १४, वय ३७ ते ५५ वर्षाचे १३ आणि वय ५९ ते ८० वर्षाचे १४ नमुने होते
- प्रयोगशाळेत आणि नंतर उंदरांवर वयोगटानुसार स्टेमसेल्सच्या चाचण्या घेण्यात आल्या
- उंदरांच्या फुफ्फुसांना बाधित करून या स्टेमसेल्सच्या चाचण्या घेण्यात आल्या.
निष्कर्ष
- जसे वय वाढते तसे मानवी शरीरातील स्टेमसेल्सचे प्रमाण कमी होते
- फक्त हिरड्यांमधील स्टेमसेल्सवर वयानुसार कोणताच परिणाम होत नाही
- हिरड्यांमधील स्टेमसेल्सची संख्या, गुणवत्ता आणि वाढ चांगली असते
- हिरड्यांमधील स्टेमसेल्स हाडांच्या उपचारासाठी प्रभावी नसल्या तरी मज्जासंस्थेशी निगडित आजारांवर प्रभावी (अल्झायमर, पार्किन्सन)
- फुफ्फुसांतील पेशींची वाढ करण्यासाठी हिरड्यांतील स्टेमसेल्स प्रभावी
उंदरांवर केलेल्या चाचणीत फुफ्फुसांतील पेशींची वाढ करण्यासाठी हिरड्यांतील स्टेमसेल्स प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. प्रत्यक्ष उपचारासाठी या संशोधनाच्या आधारे वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतील. येत्या काळात फुफ्फुसाशी निगडित आजारांत हिरड्यांतील स्टेमसेल्स महत्त्वाची भूमिका बजावतील.
- डॉ. गीतांजली तोमर, शास्रज्ञ, आयबीबी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
फोटो ः 78186
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28634 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..