
बॅंकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक
पुणे, ता. १६ ः खासगी बॅंकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तींनी एका महिलेची साडे आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ३३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बेरोजगार असून त्या नोकरीच्या शोधात होत्या. दरम्यान, श्वेता व रिधिमा नावाच्या दोन अनोळखी महिलांनी त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. त्यांनी फिर्यादीस खासगी बॅंकेत नोकरी लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून नोंदणी, रिफंड प्रोसेस, नियुक्तीपत्र, बॅंक करार अशी वेगवेगळी कारणे सांगून गुगल पे व त्यांच्या बॅंक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनीही मोठ्या बॅंकेत नोकरी लागेल, म्हणून साडे आठ लाख रुपये भरले. प्रत्यक्षात त्यांना कोणतीही नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला फोन करून ‘पैसे भरले नाही तर आयुष्यातून बरबाद करून टाकू’ अशी धमकी दिली. या प्रकारामुळे फिर्यादी घाबरल्या. त्यांनी तत्काळ पोलिसात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे करीत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28656 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..