
‘स्वच्छ एटीएम’मधील विघ्न संपेनात
पुणे, ता. १६ : शहरातील कचरा संकलित व्हावा आणि नागरिकांना त्याबदल्यात पैसेही मिळावेत यासाठी महापालिकेने एका संस्थेसोबत करार करून ‘स्वच्छ एटीएम’ बसविण्याचा निर्णय घेतला. संस्थेशी करार केला, पण या योजनेतील विघ्न अद्याप संपलेले नाहीत. पालिकेने नोटीस बजावून तंबी दिल्यानंतर एटीएम सुरू झाले पण या कचऱ्याच्या एटीएममध्ये पैसे असतात या समजुतीने एटीएमची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे आता एटीएमला सुरक्षारक्षक पुरविण्याची नामुष्की आली आहे.
शहरात नागरिक प्लास्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, धातूच्या वस्तू, रॅपर यासह इतर वस्तू बाहेर फेकून देतात. त्याऐवजी या वस्तू एटीएममध्ये टाकल्यास त्यातून नागरिकांना पैसे देण्यात यावेत, यासाठी ही योजना मान्य करण्यात आली. शहराच्या विविध भागांत ४० ठिकाणी हे एटीएम बसविण्यात येणार होते. पण आतापर्यंत केवळ नऊ ठिकाणीच ही एटीएम बसली आहेत. ही योजना कार्यान्वित होत नसल्याने महापालिकेने कामाचा ठेका रद्द करण्याची नोटीस कंपनीला बजावली. एका महिन्यात एटीएम न बसविल्यास इतर कंपन्यांकडून ही योजना राबविण्यात येईल असा इशारा दिला.
या कंपनीने आता चार एटीएम सुरू केले आहे. पण सारसबाग येथील एटीएमची चोरीच्या उद्देशाने त्याची तोडफोड ते बंद पडले. पुन्हा एटीएमची तोडफोड होऊ नये, यासाठी कंपनीने तेथे सुरक्षारक्षक नेमावेत, अशीही सूचना केली आहे, असे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.
याकडे लक्ष द्या
- या एटीएममध्ये पैसे नाहीत
- सॉफ्टवेअरद्वारे कोणत्या प्रकारचा कचरा येतो याची माहिती घेतली जाते
- त्यानुसार प्रत्येक वस्तुसाठीचे ठरावीक पैसे ऑनलाइन जमा होतात
- पैसे जमा होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j28759 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..