
राज्यात ७८ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश
पुणे, ता. १७ : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर राज्यातील नियमित निवड यादीतील ६२ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी, तर प्रतीक्षा यादीतील १५ लाख ६४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या प्रवेश प्रक्रिया निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मिळून तब्बल ७८ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. ही प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून आता या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शाळांमध्ये झालेल्या प्रवेशाची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता राज्यातील नऊ हजार ८६ शाळांनी नोंद केली होती. या शाळांमधील एक लाख एक हजार ९०६ जागांसाठी तब्बल दुप्पट म्हणजेच दोन लाख ८२ हजार ७८३ अर्ज आले होते. प्रवेश प्रक्रियेत ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची निवड यादी पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आली. त्यातील ६२ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेला सातत्याने मुदतवाढ देण्यात येत होती. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शनिवारपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील १५ हजार ६४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
प्रवेशाचा आढावा
जिल्हा : आरटीई शाळा : प्रवेश क्षमता : एकूण अर्ज : नियमित फेरी झालेले प्रवेश : प्रतीक्षा यादीतून झालेले प्रवेश
नगर : ४०० : ३,०५८ : ६,९२३ : १,८९३ : ५५१
औरंगाबाद : ५७५ : ४,३०१ : १७,२२१ : २,७०६ : ८६१
जळगाव : २८५ : ३,१४७ : ८,३५४ : २,१६६ : ४५९
नागपूर : ६६३ : ६,१८६ : ३१,४११ : ४,१४६ : १,२६४
नाशिक : ४२२ : ४,९२७ : १६,५६७ : ३,२७० : ६६३
पुणे : ९५७ : १५,१२६ : ६२,९६० : १०,३४२ : ३,०२०
ठाणे : ६४८ : १२,२६७ : २५,४१९ : ६,७७५ : १,६६९
राज्यातील एकूण आकडेवारी
एकूण शाळा : ९,०८६
एकूण जागा : १,०१,९०६
एकूण अर्ज : २,८२,७८३
नियमित फेरीत प्रवेश झालेले विद्यार्थी : ६२,८१४
प्रतीक्षा यादीतून झालेले प्रवेश : १५,६४१
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29000 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..