
‘सीएनजी’ची गाडी सुसाट
पुणे, ता. १९ : केंद्र आणि राज्य सरकारने वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्याने दुचाकी व कारचालक काहीसे सुखावले आहेत. मात्र, सीएनजी वाहन असलेल्यांना अजूनही दरवाढीचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने ब्रेक घेतला असला, तरी ‘सीएनजी’च्या दरवाढीची गाडी मात्र सुसाट आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत पुण्यात ‘सीएनजी’चे दर २२.०८ रुपयांनी वाढले आहेत.
एक एप्रिल रोजी शहरात सीएनजी ६२.२० रुपये प्रतिकिलो होता. आता तो ८५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. २०२० मध्ये अनलॉक सुरू झाल्यानंतर सातत्याने इंधनाचे दर वाढत होते. सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत होते. मात्र, तेव्हा ‘सीएनजी’चे दर स्थिर होते. परंतु, काही दिवसांनी सीएनजीदेखील महाग होत गेले. इतर इंधनाच्या किमती वाढत असल्याने जुलै २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान अनेकांनी त्यांचे पेट्रोलवरील वाहन सीएनजी करून घेतले. मात्र, जानेवारी २०२१ नंतर या वाहनचालकांनादेखील इंधन दरवाढीचा सामना करावा लागला. दोन जानेवारी २०२१ रोजी सीएनजी ५५.५० रुपये किलो होते. तेच डिसेंबर २०२१ पर्यंत ६३.९० रुपयांवर पोचले होते.
दिलासा मिळाला, पण...
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींना वैतागून पर्यायी इंधन म्हणून सीएनजीचा वापर सुरू केलेल्या आणि आधीपासूनच सीएनजी वापरत असलेल्या वाहनचालकांना एक एप्रिल रोजी मोठा दिलासा मिळाला होता. सीएनजीवरील व्हॅट १० टक्क्यांनी कमी केल्याने दर प्रतिकिलो ६.३० रुपयांनी कमी झाले होते. तेव्हा सीएनजीची किंमत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ६२.२० रुपये प्रतिकिलो झाली होती. मात्र, आधीच्या दिवशी सीएनजी अडीच रुपयांनी महागला होता.
एक एप्रिलचे दर :
पेट्रोल - ११७.०४
पॉवर पेट्रोल - १२१.५४
डिझेल - ९९.७७
सीएनजी - ६२.२०
सहा एप्रिलचे दर ः
पेट्रोल - ११९.९४
पॉवर पेट्रोल - १२४.४६
डिझेलचे - १०२.६७
सीएनजी - ६८
(यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत)
असा वाढला सीएनजीचा दर :
तारीख - नवीन दर - वाढलेली किंमत (रु.)
१ एप्रिल - ६२.२० -
१३ एप्रिल - ७३ - ३
२० एप्रिल - ७५ - २
२९ एप्रिल - ७७.२० -२.२०
२१ मे- ८० - २.८०
९ जून ८२ - २
१४ जुलै - ८५ - ३
दोनदा किमती कमी :
२१ मे ः
पेट्रोल - ९.०९
पॉवर पेट्रोल - ९.०९
डिझेल - ७.३१
१५ जुलै :
पेट्रोल - ५.०४
पॉवर पेट्रोल - ५.०५
डिझेल - ३
‘‘१ जून २०२० रोजी मी गाडी घेतली, तेव्हा सीएनजी ५५ रुपयांना होता. आता तो ८५ रुपये झाला आहे. म्हणजे दोन वर्षांत ३० रुपयांनी
किंमत वाढली. मात्र, त्या तुलनेत मला माझ्या कारमधून मिळणारे उत्पन्न वाढलेले नाही. बाकी सर्व वस्तूंच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गाडीचा धंदा आता परवडत नाही. परंतु, गाडी उभी
ठेवली तर हप्ता कसा भरायचा म्हणून चालवावी लागत आहे.’’
- बैकुंठ ओझा, कॅब व्यावसायिक
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29464 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..