
‘सभासदत्वासाठी भरलेले ९० हजार रुपये परत करा’
पुणे, ता. १९ : टूर आणि त्यातील सवलती मिळण्यासाठी ९० हजार रुपये भरूनही योग्य सुविधा दिली नाही. त्यामुळे सभासदत्वासाठी भरलेले पैसे ग्राहकाला परत करण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. तक्रारदार ग्राहकास नुकसान भरपाई म्हणून ३० हजार आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचा आदेश आयोगाच्या अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य शुभांगी दुनाखे, अनिल जवळेकर यांनी दिला.
याबाबत मंगल वाहिले आणि त्यांचे पती राजेंद्र वाहिले यांनी ॲड. पवनकुमार भन्साळी यांच्यामार्फत ‘गो लेजर इंटरनॅशनल प्रा. ली’. व त्यांचे संचालक यांच्याविरोधात आयोगात तक्रार दाखल केली. तक्रारदार पिंपरी-चिंचवड येथील बिग बाजार येथे खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी लकी ड्रॉ चे कुपन भरले. नंतर त्या कुपनमध्ये बक्षीस मिळाल्याचे सतत कंपनीचे फोन येऊ लागल्याने तक्रारदार बक्षिस घेण्यास तेथे गेले. त्यावेळी टूरचे पॅकेज व त्यातील सवलत याबाबत माहिती देण्यात आली. तक्रारदारांना सभासद होण्यास सांगितले. सभासदत्वापोटी ९० हजार रुपये तक्रारदारांकडून घेतले. परदेश दौऱ्यासाठी सवलत मागण्यासाठी ते कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले. त्यावेळी कोणतीही पूर्वकल्पना न देता ऑफिस सुद्धा बंद केल्याचे आढळले. म्हणून त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर ग्राहक मंचात धाव घेतल्यानंतर ॲड. पवनकुमार भन्साळी आणि ॲड. राघव लाहोटी यांच्यामार्फत तक्रार दाखल केली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29491 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..