
‘अग्निपथ’अंतर्गत पुण्यात भरती प्रक्रिया
पुणे, ता. १९ ः महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि केंद्रशासित प्रदेशातील दमण, दादरा आणि नगर हवेली या राज्यांसाठी नुकत्याच सुरू झालेल्या अग्निपथ योजनेंतर्गत सैन्य भरती मोहीम पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. एक अग्निवीर जनरल ड्युटीसह एकूण आठ भरती मेळावा पुण्यातील भरती मुख्यालयाद्वारे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये एक महिला सैन्य पोलिस भरती मेळाव्याचाही समावेश आहे. या प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी उमेदवारांकरिता ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
या भरती प्रक्रियेच्या पहिल्या दोन रॅली सैन्य भरती कार्यालय पुणे आणि औरंगाबाद येथे ऑगस्ट महिन्यात होणार आहे. तसेच सैन्य भरती कार्यालय मुंबई आणि नागपूरसाठी लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सैन्यदलाद्वारे सांगण्यात आले. या प्रक्रियेअंतर्गत दहावी आणि आठवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अग्निवीर म्हणून भरती केले जाणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा देखील ठेवण्यात आली आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया नागरी प्रशासन आणि स्थानिक लष्करी प्राधिकरण (एलएमए) यांच्या समन्वयाने होणार आहे. उमेदवारांना आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, छायाचित्रे, अधिसूचनेत दिलेल्या नमुन्यानुसार वैध प्रतिज्ञापत्र सोबत बाळगणे गरजेचे आहे. भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यावर उमेदवारांनी थेट लष्करी अधिकारी किंवा पोलिसांना याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन सैन्यदलाद्वारे करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेशी निगडित अधिक माहिती व नोंदणीसाठी उमेदवारांना www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29585 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..