
क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या गुजरातमधील सट्टेबाजांना अटक
पुणे, ता. २० : भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यावर लोणावळ्यामधील आपटे गावात सट्टा घेणाऱ्या पाच सट्टेबाजांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या कारवाईत ५३ हजारांची रोकड, सहा मोबाईल, लॅपटॉप, टॅब असा दोन लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अजय नटवरलाल मिठीया (वय ४७), रवी रसिकभाई रजाणी (वय २६), निपूल देवासीभाई पटेल (वय २८), जिग्नेश गणेशभाई रामाणी (वय ३२) आणि मितेश रमेशभाई सिंधू (वय २७, रा. सर्व रा. राजकोट, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
लोणावळ्यातील आपटे गावातील लेक मॅन्शन बंगल्यात भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून पाच सट्टेबाजांना ताब्यात घेतले. याबाबत लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सहायक निरीक्षक गंधारे, शब्बीर पठाण, तुषार पंधारे, विक्रम तापकीर आणि चंद्रकांत जाधव आदींनी ही कारवाई केली.
-------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29859 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..