
पर्वतीच्या भुखंडप्रकरणी आज पुन्हा सुनावणी
पुणे, ता. १९ ः पर्वती येथील डोंगरमाथा उतारावरील उद्यानाच्या आरक्षित जागेसाठी ‘टीडीआर’च्या माध्यमातून किती मोबदला द्यायचा यावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. परंतु, त्यावर उद्या शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहेत.
पर्वती टेकडी येथील भूखंड क्रमांक ५१७ (पै) व ५२३ (पै) यामधील १६ एकर जमिनीवर उद्यानाचे आरक्षण आहे. हा भूखंड ताब्यात घेण्यात घेतला असला, तरी त्याच्या मोबदल्यावरून वाद सुरू आहे. याप्रकरणात याचिका दाखल केली असून, यामध्ये राज्याच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना १९ मे रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. हे प्रकरण महापालिका प्रशासनासाठी महत्त्वाचे असल्याने या सुनावणीला पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे या दिल्लीला गेले आहेत.
गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये महापालिका व संबंधित जागा मालक यांच्यामध्ये कोणता तोडगा निघू शकतो, कोणते पर्याय असू शकतात, यावर दोन्ही पक्षकारांनी चर्चा करावी, अशी सूचना केली होती. त्यावर आता पुन्हा शुक्रवारी सुनावणी होऊन अंतिम निर्णय येण्याची शक्यता असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.