चौकाचौकांतून वाहतूक पोलिस ‘गायब’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौकाचौकांतून वाहतूक पोलिस ‘गायब’
चौकाचौकांतून वाहतूक पोलिस ‘गायब’

चौकाचौकांतून वाहतूक पोलिस ‘गायब’

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : ‘रस्त्यांवर वाहने अडवून वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करू नये’, असा आदेश दिल्यानंतर शहरातील अनेक चौकांतून पोलिस गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणाने वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठीदेखील पोलिस चौकाचौकांत हजर राहत नसल्याची सद्यःस्थिती आहे.

वाहतूक नियमनाऐवजी पोलिस दंडात्मक कारवाईवर भर देत असल्याचे प्रकार वाढल्यानंतर या मनमानी कारभाराला पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चाप लावला. वाहतूक पोलिसांकडून केली जाणारी टोइंगची कारवाई, तसेच रस्त्याला उभे राहून पावत्या फाडण्याचे प्रकार पुढील आदेश येईपर्यंत थांबवावेत, अशा सूचना वाहतूक पोलिसांना १२ जून रोजी दिल्या आहेत. त्यानंतर रस्त्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांची संख्या कमी झाल्याचे दिसते.

शहराच्या मध्यवर्ती भागासह रस्ता, मेट्रोची कामे सुरू असणाऱ्या ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. पावसामुळे तेथील कोंडीत आणखी भर पडत आहे. मात्र, अशावेळी वाहतुकीचे नियमन करण्याऐवजी पोलिसांकडून रस्त्याच्याकडेला थांबून वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. टोइंग वाहनावरील पोलिस कर्मचाऱ्यांसह कामगारांकडूनही वाहने उचलताना वाहनचालकांशी हुज्जत घालण्याचे, त्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार घडले आहेत.

या चौकात नसतात पुरेसे वाहतूक पोलिस :
जेधे चौक, सेव्हन लव्ह्ज चौक, पुलगेट चौक, राष्ट्रभूषण चौक, अभिनव चौक, शनिपार चौक, नाझीरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक, डॉ. हेगडेवार चौक, केळकर, शिंदेपार चौक, बालगंधर्व, मॉडर्न कॉलेज चौक, तुकाराम पादुका चौक, गुडलक चौक, नळस्टॉप चौक, पौड फाटा, कर्वे पुतळा, अण्णा भाऊ साठे चौक.

वाहतूक नियमनापेक्षा या बाबींना महत्त्व :
- नो-पार्किंगमधील वाहने चालकासमोर उचलून टोइंगचे शुल्क वसूल करणे
- वाहनचालक पावती करीत असेल, तरी गाडी टोइंगचा आग्रह धरणे
- गाडी उचलणाऱ्या तरुणांची अरेरावी
- अधिकार नसतानाही टोइंग बॉयच्या हाती दंडात्मक कारवाई करण्याचे मशिन
- चौकात एखाद्या कोपऱ्यात थांबून होणारी कारवार्इ

‘‘विभागाकडे उपलब्ध असलेले सर्व मनुष्यबळ आपण वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वापरत आहोत. आजही रस्त्यावर असलेल्या पोलिसांची संख्या पूर्वी होती तेवढीच आहे. प्रत्येक विभागात महत्त्वाच्या चौकानुसार पोलिसांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.’’
- राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

‘‘कामावर जाताना मला बाजीराव रस्त्यावर अनेक ठिकाणी पोलिस दिसायचे. मात्र, आता त्यांची संख्या कमी झाल्याचे दिसते. त्यामुळे कारवार्इ नक्कीच कमी झाली असणार. मात्र, कोडी झाल्यानंतर वाहतुकीचा वेग मंदावतो व ती सोडविण्यासाठी त्वरित पोलिस उपलब्ध नसतात.’’
- भाग्यश्री काटकर, नोकरदार

‘‘माझे कायम तुकाराम पादुका चौकातून येणे-जाणे असता. त्यामुळे कधी-कधी तेथे वाहतूक कोंडीचा सामाना करावा लागतो. पोलिस असल्यानंतर जास्त अडथळा येत नाही. मात्र, गेल्या महिनाभरापासून चौकात फार क्वचित पोलिस दिसत आहेत.’’
- दत्तात्रेय पांचाळ, व्यावसायिक

Web Title: Todays Latest Marathi News Pne22l15397 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..