महापालिकेकडून मिनी नाट्यगृहाचे आश्वासन कागदावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drama
‘प्रायोगिक’ला खासगी नाट्यगृहांचा आधार!

महापालिकेकडून मिनी नाट्यगृहाचे आश्वासन कागदावरच

- महिमा ठोंबरे

पुणे - पुण्यातील प्रायोगिक रंगकर्मींना नाट्यप्रयोगासाठी हक्काचे ठिकाण म्हणून सुदर्शन रंगमंच, भरत नाट्य मंदिर याच नाट्यगृहांचा आधार होता. मात्र, गेल्या काही वर्षांत शहरात काही सुसज्ज खासगी नाट्यगृहे उभी राहिली आहेत. छोटेखानी, तंत्रसज्ज आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे असल्याने द बॉक्स, द बेस यांसारख्या नवीन नाट्यगृहांना रंगकर्मी पसंती देत आहेत. त्यामुळे प्रायोगिक रंगभूमीला खासगी नाट्यगृहांनी आधार दिला असल्याचे चित्र आहे.

पुण्यात व्यावसायिक रंगभूमीसह प्रायोगिक रंगभूमीवरही विविध प्रयोग होतात. तरुण रंगकर्मींसह व्यावसायिक रंगकर्मीही प्रायोगिक रंगभूमीवर नवीन काहीतरी करण्यास प्रयत्नशील असतात. यापूर्वी त्यांना नाट्यप्रयोग करण्यासाठी मर्यादित पर्याय होते. महापालिकेनेही मिनी नाट्यगृहे बांधण्याचे आश्वासन दिले असले तरी ते कागदावरच आहे. अशावेळी जुन्या नाट्यगृहांसह नवीन तयार झालेल्या नाट्यगृहांनी या रंगकर्मींना आधार दिला. एरंडवणे येथील द बेस, कर्वे रस्त्यावरील द बॉक्स, खडकवासला बॅकवॉटरजवळील झपूर्झा या नव्याने बांधलेल्या नाट्यगृहांमध्ये नियमित नाट्यप्रयोग होत आहेत. याशिवाय सदाशिव पेठेतील सुदर्शन रंगमंच, भरत नाट्य मंदिर, ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक स्मारक मंदिर यांनाही पसंती मिळते आहे.

लेखक-दिग्दर्शक ओंकार गोखले म्हणाला, ‘महापालिकेची मोठी नाट्यगृहे मोक्याच्या दिवशी प्रायोगिक रंगकर्मींना मिळणे, हे दुरापास्तच आहे. अशावेळी नवीन तयार होणारी खासगी नाट्यगृहे प्रायोगिक रंगभूमीसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. यामुळे जास्तीत जास्त रंगकर्मींना आपले प्रयोग प्रेक्षकांपर्यंत पोचवता येत आहेत.’

प्रायोगिक रंगकर्मींसमोर खर्चाची जुळवाजुळव करण्याचे आव्हान असते. नवीन तयार झालेली नाट्यगृहे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहेत. बरेचदा उत्पन्नाची रक्कम ५०-५० टक्के किंवा ४०-६० टक्के विभागून घेण्याचा पर्यायही ते उपलब्ध करून देतात. हा मोठा दिलासा मिळत असल्याने या नाट्यगृहांना प्रायोगिक रंगकर्मींची पसंती मिळते.

- धनंजय सरदेशपांडे, लेखक-अभिनेते

नियमित नाट्यप्रयोग होत असलेली खासगी नाट्यगृहे

  • द बॉक्स

  • द बेस

  • भरत नाट्य मंदिर

  • झपूर्झा

  • सुदर्शन रंगमंच

  • ज्योत्स्ना भोळे सभागृह

Web Title: Todays Latest Marathi News Pne22l43943 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..