काम न करण्याचं बिनपगारी घरकाम... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काम न करण्याचं
बिनपगारी घरकाम...
काम न करण्याचं बिनपगारी घरकाम...

काम न करण्याचं बिनपगारी घरकाम...

sakal_logo
By

‘दोन वेळचे मोफत जेवण व राहण्याची सोय. पगार मात्र नाही,’ अशी जाहिरात वाचून गणू घरकामाच्या मुलाखतीसाठी आला होता. सुधाकररावांनी मुलाखत घेण्यास सुरवात केली.
सुधाकरराव ः सध्या काय करतोस?
गणू ः जमिनीला पाठ लावून, आकाशातील चांदण्या मोजण्याचं काम सध्या हाती घेतलंय.
सुधाकरराव ः म्हणजे रिकामटेकडे दिसताय.
गणू ः असं म्हणू नका. मोठमोठी कामं घेण्याची मला आवड आहे. अलिबागच्या समुद्रातील लाटांचे पार्किंग करण्याचं काम एक वर्षे माझ्याकडंच होतं. त्यानंतर अरबी समुद्रातील पाण्याला निळा रंग देण्याचं कामही काही वर्षे मी केलं आहे. सध्या पुण्यातील खड्डे मोजण्याचं काम मी हाती घेतलंय. आतापर्यंतचं सर्वात अवघड काम हे आहे. दिवस-रात्र मोजमाप करूनही ते काम पूर्ण होत नाही.
सुधाकरराव ः तुमच्या अंगात काही कला वगैरे आहे का?
गणू ः मला ‘न’कला करता येतात. एखाद्याने टाळी वाजवल्यास, सेम टू सेम तशी टाळी मी वाजवतो. शिवाय हुबेहुब बकरीचा आवाज काढतो. (असे म्हणून गणूने बेंऽऽऽबेंऽऽऽ’ करून दाखवतो.)
सुधाकरराव ः घरगुती कामाचा काही अनुभव?
गणू ः हो. सांगाल ती कामे आणि ऐकवाल ती बोलणी निमूटपणे खाण्याचा मला दांडगा अनुभव आहे. चुकूनही मी उलट उत्तर देत नाही. शिवाय चुकलं नसलं तरी ‘सॉरी’चा जपही जपतो.
सुधाकरराव ः अरे व्वा! हे कसं काय जमतं?
गणू ः साहेब माझं लग्न झालंय. त्यामुळे वरील गुण माझ्या अंगात आपोआप आलेत.
सुधाकरराव ः आधीच्या ठिकाणी घरगुती काय काम करायचा?
गणू ः स्वयंपाकाचं काम माझ्याकडं होतं.
सुधाकरराव ः मग ते का सोडलं? पगार कमी होता का?
गणू ः नाही. पगार चांगला होता पण मलाही तिथेच जेवण करून जात जा, असा आग्रह होऊ लागल्याने मला नाइलाजास्तव ती नोकरी सोडावी लागली.
सुधाकरराव ः याचा अर्थ तू स्वयंपाक बेचव करायचा असा होतो.
गणू ः छे. छे. साहेब! तिखट-मिठाचं प्रमाण चुकायचं, एवढीच किरकोळ चूक माझ्या हातून व्हायची. अनेकजण चमच्याने भाजीत तिखट- मीठ घालतात. मला असला नाजूकपणा जमायचा नाही. मी मुठी-मुठीने या वस्तू भाजीत घालायचो. शिवाय रोज एखाद्या देशाच्या नकाशाचा आकार भाकरीला द्यायचो. फार प्रयत्नपूर्वक ही कला मी आत्मसात केली होती. भारत, इंग्लंड, चीन, ब्राझिल, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या नकाशासारखी भाकरी बनवून, त्या देशाची भौगोलिक माहिती देऊन, त्यांच्या ज्ञानात भर घालायचो पण मलाही तिथेच जेवण्याचा आग्रह होऊ लागल्याने मी ती नोकरी सोडली.
सुधाकरराव ः बापे रे! तुला स्वयंपाक वगैरे करायला मी कधी देणार नाही.
गणू ः बरं तुम्ही काय काम करता?
सुधाकरराव ः मलाच अजून ते नीट कळलं नाही पण मी काही माणसं कामाला ठेवली आहेत. माझ्या पाठीमागे बोलण्यासाठी. त्यांना पगार शून्य आहे पण काम फार इमानदारी करतात. भेटेल त्याच्याकडे माझी निंदानालस्ती करतात. अर्थात सध्या तुला हे काम मी देणार नाही.
गणू ः ‘दोन वेळचे मोफत जेवण व राहण्याची सोय’ अशी जाहिरात वाचूनच मी आलो आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे काय काम करायचंय?
सुधाकरराव ः काम फार सोपं आहे. समोरच्या प्रार्थनास्थळामध्ये भाविकांसाठी रोज महाप्रसाद असतो. तू तिथं दोनवेळेला जेवायचं आणि परत येताना मला डबा घेऊन यायचं. एवढंच तुझं काम.
गणू ः आणि राहण्याची सोय?
सुधाकरराव ः समोरच्या झाडाखाली जमिनीला पाठ लावून, आकाशातील चांदण्या मोजायच्या. नाहीतरी तुला या कामाचा प्रचंड अनुभव आहेच. उद्यापासून कामावर ये.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22l96670 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..