देशासमोर हिंदुत्वाचे मोठे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशासमोर हिंदुत्वाचे मोठे आव्हान
देशासमोर हिंदुत्वाचे मोठे आव्हान

देशासमोर हिंदुत्वाचे मोठे आव्हान

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः देशासमोर सध्या हिंदुत्व आणि अध्यात्माच्या माध्यमातून सांस्कृतिक क्रांतीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हे समाजासाठी घातक आहे. समाजवाद आणि समृद्धीचे भांडण नाही. परंतु यातून विचारांची कोंडी झाली आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी लोकांशी बोलीभाषेतून बोलले पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद आणि भेटीगाठी वाढविणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी शनिवारी (ता.१५) व्यक्त केले. दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या विचारधारेवर आधारित विविध चार पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू, सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर, डॉ. लता प्र. म., डॉ. सुरेंद्र जोंधळे, डॉ. गेल आॅम्व्हेट वारसा गटाच्या समन्वयक प्रा. डॉ. नागमणी राव, सामाजिक कार्यकर्ते आणि गेल आॅम्‍व्हेट यांचे पती डॉ. भारत पाटणकर, कन्या प्राची पाटणकर आदी उपस्थित होते.
डॉ. आढाव म्हणाले, ‘‘गेल आॅम्व्हेट ही एक अमेरिकन मुलगी भारतात येते. इथल्या मातीत मिसळून जाते. ती पळाली नाही. चिकित्सा करत बसली नाही. पण तिने सत्यशोधक चळवळीवर संशोधन व अभ्यास करत या चळवळीत स्वतःला झोकून दिले. मग भारतातील बाकीच्या डाव्यांना का नाही वाटले, की सत्यशोधक चळवळीचा शोध घ्यावा.’’
यावेळी डॉ. भारत पाटणकर व प्राची पाटणकर यांनी लिहिलेल्या झपाटलेले सहजीवन ः परंपरा मोडणारी परंपरा, प्रा. संजयकुमार कांबळे यांनी संपादित केलेल्या डॉ. गेल आॅम्व्हेट समाजशास्त्रीय आकलन व गेल आॅम्व्हेट समजून घेताना आणि अन्य एका इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संजयकुमार कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश बाबर यांनी आभार मानले.