
ए क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ?...
मा. वरिष्ठ पोलिस अधिकारी,
विषय : पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांशी आपुलकीने वागल्याबद्दल फौजदारसाहेबांवर कारवाई करण्याबाबत.
मा. साहेब, माझ्या दुचाकीला अपघात झाल्याची तक्रार घेऊन, मी आज सकाळी पोलिस ठाण्यात गेलो होतो. मात्र, तेथील वातावरण आपल्या खात्याला साजेसे नव्हते, हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. पोलिस जर असेच वागत राहिले तर समाजात आपल्या खात्याचा वचक कमी होईल, याची चिंता मला सतावते. तेथील पोलिस कर्मचारी व अधिकारी मंडळीही नागरिकांशी सौजन्याने वागत असल्याचे दिसले. त्यातील काहीजण सर्वसामान्य व्यक्तींना ‘पाणी घेणार का’ असे विचारत होते. आमच्या ‘चहा-पाण्याचं’ बघा, असं पोलिस नागरिकांना म्हणत असल्याची प्रथा असताना फौजदारसाहेब मलाच ‘चहा घेणार का’ असे विचारत होते. असं वागणं पोलिस खात्याच्या ध्येय धोरणाच्या विरोधात आहे. सर्वसामान्य लोकांना पोलिस ठाण्यात आदराने वागवणं, हा दखलपात्र गुन्हा ठरवून, संबंधित पोलिस व फौजदारसाहेबांवर कडक कारवाई करावी, ही विनंती.
साहेब, मी पुण्यात राहणारा वाहनचालक असल्याने वाहतुकीचे नियम पाळण्याचा आणि माझा तसा फारसा संबंध येत नाही. मी नेहमीच घाईत असल्याने सिग्नल तोडणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. समजा कोणी नियमांची आठवण करून दिली तर वाद घालण्यामध्येही मी पटाईत आहे. सिग्नल तोडून मी जात असताना असाच एक वाहनचालक मला उपदेशाचे डोस पाजत होता. त्यावेळी मी त्याला चांगलाच ‘डोस’ भरला. मात्र, नेमकं त्याचवेळी एकजण मला पाठीमागे येऊन धडकला. त्यामुळे आमच्यात भांडणे झाली. भांडणात मला तो वरचढ होऊ लागल्याने पोलिस ठाण्यात चल, असे मी त्याला धमकावले. पोलिसांचे नाव काढताच ‘नको. नको. इथंच काहीतरी तडजोड करू,’ अशी विनंती तो करील, असे वाटले होते. मात्र, माझ्या या आत्मविश्वासाला तडा गेला.
साहेब, आम्ही दोघेही पोलिस ठाण्याची पायरी चढल्यानंतर सुहास्य वदनाने फौजदारसाहेब आमच्याकडे आले. ‘आपली काय सेवा करू?’ असे त्यांनी विचारले. तेवढ्यात एक पोलिस ट्रेमधून थंडगार पाणी घेऊन आला.
मी अपघाताची माहिती साहेबांना दिली.
‘‘साहेब, घाबरू नका. मी लगेच तक्रार नोंदवतो.’’ फौजदारांनी दिलासा दिला.
‘‘साहेब, ते तक्रारीचं जाऊ द्या. हा माझ्या गाडीला धडकलाय. त्याने दहा हजारांची नुकसानभरपाई दिली पाहिजे.’’ असं म्हणून मी त्यांना पाच हजाराची ऑफर दिली. मात्र, लाच देणे व घेणे गुन्हा असल्याचं पालुपद त्यांनी लावलं.
‘‘गाडीचं फार नुकसान झालं नाही. त्यामुळे नुकसानभरपाई घेऊ नका.’’ अशी विनंती त्यांनी केली.
‘‘माणुसकीचंच काय पण रक्ताची नातीही पैसा तोडतो. त्यामुळे कोणत्याही गैरमार्गाने, धमकावून वा कशाची भीती दाखवून पैसे कमवणं, पाप आहे. सन्मार्गाने कमवलेला पैसाच टिकतो व लाभतोही.’’ फौजदारसाहेबांनी प्रवचन दिलं. त्यामुळं आम्ही तक्रार अर्जाची प्रत घेऊन, मुकाट्याने घरी निघालो.
साहेब, चालून आलेल्या लक्ष्मीचा स्वीकार करायचा असतो, हे साहेबांना कोणी शिकवलेले दिसत नाही. त्यांनी थोडी दमदाटी केली असती तर त्यांना पाच हजार व मला पाच हजार मिळाले असते. उद्या सगळेच पोलिस असे वागू लागल्यावर माझ्या गाडीला कोणी धडकल्यावर कोणीच नुकसानभरपाई देणार नाही. मग माझा संसार कसा चालेल? त्यामुळे तुम्ही संबंधित फौजदार व इतर पोलिसांवरही कारवाई करून, चुकीच्या प्रथा बंद पाडाव्यात, ही विनंती.
कळावे,
आपला दिनेश धडके
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78192 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..