
राज्यात ५५७ दशलक्ष युनिट वीजचोरी उघड
पुणे, ता. ९ : वीजग्राहकांना विविध सवलत योजना देतानाच वीज गळती कमी करण्यासाठी महावितरणने आता वीजचोरांविरुद्ध कंबर कसली आहे. विभागीय स्तरावरील भरारी पथकांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात (२०२१-२२) मध्ये राज्यात ५५७ दशलक्ष युनिट विजेची चोरी उघडकीस आणली आहे. उच्च व लघुदाब वर्गवारीमध्ये २२ हजार ९८७ ठिकाणी ३१७ कोटी ४५ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. त्यापैकी १७२ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली झाली आहे.
वीजचोरी विरोधात कारवाईसाठी विभागांतर्गत राज्यात परिमंडलस्तरावर ८, मंडलस्तरावर २० तर विभागीयस्तरावर ४० असे एकूण ६८ पथके असून, त्यात सुमारे ३४५ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामधील मंडलस्तरावरील २० पथके गेल्या नोव्हेंबर २०२१ मध्ये नव्याने स्थापन करण्यात आली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वीजवापराचे विश्लेषण करून संशयित ठिकाणी वीजयंत्रणेची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी महावितरणकडून माहिती व तंत्रज्ञान प्रणाली वापरण्यात येत आहे. त्यामुळे वीजचो-यांच्या संख्येऐवजी विजेच्या युनिटची अधिक चोरी होणा-या ठिकाणी आता लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकताच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचा आढावा घेतला, त्यामध्ये ही माहिती समोर आली.
----------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78242 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..