
बदल्यांसाठीची ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित
पुणे, ता. ९ : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी नव्याने तयार केलेली संगणकीय प्रणाली (बदली सॉफ्टवेअर) गुरुवारपासून (ता.९) कार्यान्वित केली आहे. ही संगणकप्रणाली म्हणजे संगणक आणि मोबाईलवर चालणारे खास ॲप आहे. त्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज (ता.९) मंत्रालयात अनावरण करण्यात आले.
शिक्षकांच्या नवीन बदली धोरणांनुसार ही संगणकप्रणाली विकसित केली आहे. संगणकप्रणालीमुळे शिक्षकांच्या लवकरच बदल्या होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच शिक्षकांच्या बदल्या होऊ शकणार आहेत. राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी ही संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. कोरोना काळात शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. परंतु आता या नव्या प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्यांना गती मिळू शकणार आहे. ही प्रणाली जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांसाठी विकसित केली आहे. संगणकीय प्रणालीच्या अनावरणप्रसंगी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव का.गो.वळवी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, वर्ध्याचे सीईओ सचिन ओंबासे, मुंबई पालिका सहआयुक्त अजित कुंभार आदी उपस्थित होते.
संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या अभ्यासगटाने मागील बदली प्रक्रियेत असलेल्या सर्व त्रुटी दूर करून नवीन सर्वसमावेशक अशी ही प्रणाली विकसित केली आहे. पूर्वी शिक्षकांची बदली करताना विविध समस्या निर्माण होत होत्या. आता ऑनलाइन प्रक्रियेमुळे बदली प्रक्रियाच पारदर्शक होईल.
- हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78255 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..