
पीएमपी : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत होणार बदल शहरात लवकरच धावणार २०० ई-कॅब
प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे: ता. १० : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या पीएमपीची सेवा आता कात टाकत आहे. कारण पीएमपी पहिल्यांदाच ई-कॅब सेवा सुरु करीत आहे. पहिल्या टप्यांत २०० कॅब धावतील. दराबाबत अद्याप निर्णय झाला नसला, तरी सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे दर असतील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. ही सेवा पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा बदल ठरणार आहे.
या सेवेचा दर प्रति किलोमीटर १८ ते २० रुपये इतका असण्याची शक्यता आहे. पीएमपी या सेवेसाठी २०० कॅब भाडे तत्त्वावर घेत असून त्यास आवश्यक ती मंजुरी मिळाली आहे. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव लवकरच बोर्डासमोर ठेवला जाईल. मान्यतेची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दोन महिन्यांच्या आतच ई-कॅब प्रत्यक्षांत धावू लागतील. या सेवेचे दर रिक्षाच्या तुलनेत थोडे महाग आणि ओला, उबेरच्या तुलनेत कमी असणार आहे. त्यामुळे ते सामान्य प्रवाशांच्या आवाक्यात असतील.
मोबाईल ॲपवरुन मिळेल कॅब :
पीएमपी या सेवेसाठी नवीन ॲप विकसित करीत आहे. त्यावरून प्रवाशांना कॅब बुक करता येईल. ज्या प्रवाशांकडे मोबाईल नाही, त्यांना देखील या सेवेचा लाभ मिळण्यासाठी पाच थांबे निश्चित करण्यात येणार आहे. त्या ठिकाणांहून प्रवाशांना थेट कॅब बुक करून प्रवास करता येईल. यात पुणे विमानतळ, रेल्वे स्थानक, स्वारगेट बस स्थानक, डेक्कन आदी ठिकाणांचा समावेश आहे.
चार झोनची निवड :
ई-कॅबचे चार्जिंग करण्यासाठी चार झोन ठरविण्यात आले आहे. यात पुण्याच्या चारही दिशेच्या ठिकाणांचा समावेश आहे. यात बाणेर, वाघोली, भेकराई नगर, बिबवेवाडी या चार ठिकाणी पीएमपीचे डेपो असून त्या ठिकाणी कॅबचे चार्जिंग केले जाईल. तसेच काही खासगी चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी देखील ई-कॉबसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे.
पीएमपी सेवा दृष्टिक्षेपात :
-पीएमपीचे रोजचे सध्याचे प्रवासी : १० लाख
-उत्पन्न : १ कोटी ३५ लाख रुपये
-कोरोनापूर्व काळातील प्रवासी संख्या : ११ लाख
उत्पन्न : १ कोटी ५० लाख रुपये
हे बदल होणार :
-कॅब रस्त्यावर आल्यानंतर किमान एक हजार दुचाकी व चारचाकी वापर कमी होण्याची शक्यता
-दररोज किमान पाच हजार प्रवाशांची वाहतुकीचा होण्याचा अंदाज
कॅब सेवा सुरु करण्याची सर्व प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. बोर्डची मान्यता मिळताच उर्वरित कामांना वेग येईल. दोन महिन्यांच्या आत पुणेकरांच्या सेवेत कॅब धावू लागेल.
-डॉ लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी, पुणे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78494 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..