
पुलंचं संचित पुढे नेण्याची जबाबदारी आपली ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले; पु. ल. स्मृती महोत्सवाचे उद्घाटन
पुणे, ता. ११ : ‘‘मराठी भाषेची अनेकविध सौंदर्यस्थळे पुलंनी उलगडून दाखवली. साहित्य-समाज व्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानावर असूनही साधनशुचिता आणि आर्थिक व्यवहारातील शुचिता जपली. साहित्य-संस्कृतीचे मालक नाही, तर विश्वस्त म्हणून काम करण्याची भूमिका त्यांनी कायम निभावली. भारतीय साहित्य आणि संस्कृतीचे जे उच्चतम बिंदू आहेत, ते सगळे त्यांच्यामध्ये होते. पुलंनी दिलेले हे विचार, विवेक आणि तत्त्वज्ञानाचे संचित अनमोल आहे. ते पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.
कोहिनूर प्रस्तुत आणि आशय फिल्म व सांस्कृतिक क्लब आयोजित ‘पु. ल. स्मृती महोत्सवा’च्या उद्घाटन सोहळ्यात शनिवारी ‘पुलंचे संचित’ या विषयावर त्या बोलत होत्या. अभिनेत्री मुक्ता बर्वे, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक प्रकाश मगदूम, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार आदी या वेळी उपस्थित होते. मगदूम यांनी संग्रहालयाच्या माध्यमातून दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
मगदूम म्हणाले, ‘‘चित्रपटांचे जतन-संवर्धन करायचे असते, तो एक वारसा आहे, याची जाणीव नसल्याने अनेक चित्रपट काळाच्या ओघात नष्ट झाले. १९६४ मध्ये राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्थापना झाल्यानंतर या कामाला सुरुवात झाली. मी संचालक म्हणून जे काम केले, त्याचे श्रेय माझ्या सहकाऱ्यांचेही आहे. आम्ही संग्रहालयाचे कामही अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला.’’ वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
रंगमंचीय अविष्काराचे सादरीकरण
पु. ल. आणि सुनिताबाई यांच्यावर ‘अनुभव’ या मासिकात आलेल्या ‘तप:स्वाध्याय’ या ललित निबंधावर आधारित अभिवाचनाचा ‘प्रिय भाई...एक कविता हवी होती’ हा रंगमंचीय अविष्कार या वेळी सादर करण्यात आला. अमित वझे दिग्दर्शित या कार्यक्रमाचे लेखन आणि रंगावृत्ती डॉ. समीर कुलकर्णी यांची, तर चित्रे मिलिंद मुळीक यांची होती. हा कार्यक्रम जयदीप वैद्य, अपर्णा केळकर, निनाद सोलापूरकर, अमित वझे आणि मुक्ता बर्वे यांनी सादर केला.
आज लोकल आणि ग्लोबल याबद्दल आपण बरेच बोलत असतो. पण, एकाचवेळी कमालीचा लोकल असून कमालीचा ग्लोबल, असा माणूस म्हणजे पुल. जगभरातल्या चांगले ते आपल्याकडे आणूया आणि आपल्याकडील चांगले त्याचेही स्मरण ठेवूया, हा विचार त्यांनी जपला.
-मंगला गोडबोले, ज्येष्ठ साहित्यिका
2S70460
टिळक रस्ता, पुणे : स. प. महाविद्यालयात आयोजित पु. ल. स्मृती महोत्सवात प्रकाश मगदूम यांचा सत्कार करताना (डावीकडून) वीरेंद्र चित्राव, मुक्ता बर्वे, मंगला गोडबोले, मगदूम आणि सतीश जकातदार.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79002 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..