
दशकभरात राज्य खासगी विद्यापीठ दुप्पट
‘आयबीइएफ’चा अहवाल : उच्च शिक्षणात सकल नोंदणी ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट्ये
दशकभरात राज्य खासगी विद्यापीठ दुप्पट
सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २१ : देशभरातील एकूण विद्यापीठांमध्ये राज्य खासगी विद्यापीठांचा (स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी) वाटा आता लक्षणीयरित्या वाढत आहे. २०११-१२ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये हे प्रमाण दुपटीने वाढल्याचे इंडिया ब्रांड इक्विटी फाउंडेशनच्या (आयबीइएफ) अहवालातून निदर्शनास आले आहे.
२०११ मध्ये एकूण विद्यापीठात राज्य खासगी विद्यापीठांचे प्रमाण १६.९ टक्के होते. हेच प्रमाण २०२० मध्ये ३२.३ टक्क्यांवर पोचले आहे. देशभरातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या, व्यवसायाभिमुख खासगी शिक्षण संस्थांची चलती, तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये २०३५ पर्यंत उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नोंदणी (ग्रॉस एनरोलमेंट रेशो) ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय, अशा कारणांमुळे येत्या काळात विद्यापीठांची अथवा स्वायत्त शैक्षणिक संस्थांची संख्या वाढत जाणार आहे. गुणवत्ता प्रधान विद्यापीठेच येत्या काळात अधिक सक्षम होतील, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
आकडेवारीचे निष्कर्ष :
- नवे एकही सरकारी विद्यापीठ मागील दहा वर्षात नाही
- राज्य खासगी विद्यापीठांची संख्येत झपाट्याने वाढ
- ‘एआयसीटीई’ने बोगस तंत्रशिक्षण संस्था कमी केल्या
- नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणासाठी ३.५ कोटी नव्या जागा निर्माण करणार
देशभरातील विद्यापीठांचे प्रमाण (टक्क्यांमध्ये) ः
प्रकार ः वर्ष २०११-१२ ः वर्ष २०१९-२०
- राज्य सरकारी विद्यापीठ ः ४६.१ ः ३८.१
- राज्य खासगी विद्यापीठ ः १६.९ ः ३२.३
- अभिमत विद्यापीठे खासगी ः १२.७० ः १३.३०
- राष्ट्रीय महत्त्वाचे विद्यापीठ ः ९.५ ः ७.९
- केंद्रीय विद्यापीठे ः ६.८ ः ४.७
- अभिमत सरकारी विद्यापीठ ः ६.१ ः ३.६
(स्रोत ः आयबीईएफ)
देशातील महाविद्यालयांची संख्या
वर्ष ः संख्या
२०१७ ः ४०,०२६
२०१८ ः ३९,०५०
२०१९ ः ३९,९३१
२०२० ः ४२,३४३
(स्रोत ः यूजीसी)
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) मान्यता दिलेल्या शैक्षणिक संस्था ः
वर्ष ः संख्या
२०१८-१९ ः १०४२३
२०१९-२० ः १०९८०
२०२०-२१ ः ९६२०
२०२१-२२ ः ८९९७
नवीन शैक्षणिक धोरणात प्रत्येक विद्यापीठाला तीन हजार विद्यार्थ्यांची मर्यादा असणार आहे. त्यामुळे निश्चितच विद्यापीठांची संख्या वाढणार आहे. आता विद्यापीठांची वर्गवारी संशोधन विद्यापीठ, संशोधन व शैक्षणिक विद्यापीठ आणि शैक्षणिक विद्यापीठ अशी करण्यात येणार आहे. या स्पर्धेत गुणवत्ता नसलेली विद्यापीठे मागे पडणार आहे.
- डॉ. अरविंद नातू, अध्यक्ष, कार्यकारी मंडळ, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, कोलकता.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79039 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..