
आधुनिक प्रवासाची चाके पंक्चर!
पुणे, ता. १२ ः ‘पीएमपी’चा आधुनिकतेच्या दिशेने जाण्याचा सुरू असलेल्या प्रवासाला ‘ब्रेक’ लागला. कारण वर्षभरापासून पीएमपीला टोपी घालणाऱ्या खासगी संस्थेस पीएमपीने अखेर काळ्या यादीत टाकत बाहेरचा रस्ता दाखविला. प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या मोबाईल ॲप व वेबसाइट विकसित करण्याचे काम ज्या संस्थेस दिले होते, त्याने वर्षभरापासून पीएमपी प्रशासनाला केवळ खेळवत ठेवले. दोन वेळेस स्मरणपत्र देऊनही वेबसाइट व ॲपचे काम काही केल्या होत नसल्याचे पाहून पीएमपीने त्यांचे कंत्राट रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकले. यात काही राजकीय व्यक्तीचा थेट संबंध असल्याने पीएमपीचे अधिकारी यावर बोलण्यास तयार नाही. याचे पत्र ‘सकाळ’च्या हाती लागले आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने कात टाकली असली तरीही पीएमपी पारंपरिक मार्गानेच प्रवासी सुविधा देत आहे. रेल्वे, एसटी गतिमान झाल्या. पीएमपीला मात्र पुढचा गियर टाकता आला नाही. प्रवाशांना घरबसल्या बसची माहिती, वेळा, ॲप वरून तिकीट काढणे, वेळापत्रक, तिकीट दराची माहिती आदी प्राथमिक माहिती गरजेचे होते. त्यासाठी मोबाईल ॲप विकसित करण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीस देण्यात आले. वर्षभरात ॲपवर कागदी घोडे नाचले. पण प्रत्यक्षात ना प्रशासनाच्या हाती काही आले ना प्रवाशांच्या, पीएमपीच्या स्मरण पत्राला देखील केराची टोपली दाखविली गेली. अखेर पीएमपीने त्याचे कंत्राट रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकले.
मग कॅब धावणार कशी?
पीएमपी येत्या दीड महिन्यात कॅब सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठीची सर्व तयारी झाली. २०० इ कॅब धावतील. मात्र, प्रवाशांना कॅब बुक करण्यासाठी ॲप असणे गरजेचे आहे. अद्याप ॲपचा थांगपत्ता नाही. मग पीएमपीची कॅब धावणार कशी. याचा थेट प्रवाशांना बसणार आहे. कॅब सेवा सुरू होण्यास आणखी काही महिन्याचा विलंब लागण्याची शक्यता आहे.
प्रवासी या सुविधेपासून वंचितच
येणाऱ्या काळात सर्व प्रवासी सुविधा प्रवाशांना एकाच प्लटफॉर्मवर मिळाव्या म्हणून ॲपचा निर्णय झाला. बसचे वेळापत्रक, मार्ग, तिकिटाचे दर, बसचे करंट लोकेशन, विविध प्रकारचे पास, तिकीट काढण्याची सुविधा, कॅबचे बुकिंग यासह मेट्रोचे तिकीट देखील याच ॲप वरून काढण्याची योजना पीएमपीने बोलून दाखविली. मात्र, सध्या तरी ती धुळीस मिळाली आहे. त्यामुळे आणखी किती दिवस प्रवाशांना या सुविधेपासून वंचित राहावे लागणार हा प्रश्न निर्माण होतो.
आता पुढे काय?
‘पीएमपीएल’ने त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकल्यानंतर आता दुसऱ्या खासगी कंपनीचा शोध घेत आहे. यासाठी आणखी किती दिवस लागतील हे देखील माहीत नाही. मात्र, याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. एक ते दोन कंपन्यांच्या नावाची सध्या प्राथमिक स्तरांवर चर्चा सुरू आहे. मात्र, या बाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79130 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..