आईंच्या फाटक्या चपला मुलांमुळे झाल्या पादुका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आईंच्या फाटक्या चपला
मुलांमुळे झाल्या पादुका!
आईंच्या फाटक्या चपला मुलांमुळे झाल्या पादुका!

आईंच्या फाटक्या चपला मुलांमुळे झाल्या पादुका!

sakal_logo
By

‘‘आई, घराबाहेर चल ना. तुझ्यासाठी सरप्राईज आहे.’’ निखिलने असे म्हटल्यावर आई बाहेर निघाली. तिला थांबवत निखिल म्हणाला,‘‘आई, तसं यायचं नाही. आधी डोळे बंद कर.’’ त्यानुसार आई अंगणात आली.
‘‘आता सावकाश डोळे उघड.’’ निखिलने म्हटले. आईने तसं केल्यानंतर समोर चारचाकी गाडी दिसली.
‘‘निखिल, तू गाडी घेतलीस.’’ असे म्हणून तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
‘‘आई, आम्हा भावंडांना पोटभर खायला मिळावं, आमचं शिक्षण व्हावं, यासाठी आयुष्यभर दहा किलोमीटरवरील मसाल्याच्या कारखान्यात अनवाणी धावत-पळत होतीस. पाच-दहा रुपये वाचावेत, यासाठी कधीही एसटी वा जीपगाडीनेही प्रवास केला नाहीस, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे मी ठरवलं होतं, की एक ना एक दिवस आपली आई स्वतःच्या चारचाकी गाडीतून प्रवास करील. कामाच्या व्यापामुळे तुला कधी अष्टविनायकाच्या यात्रेला जाणं जमलं नाही, ही खंत तुला सतावते म्हणून पहिल्यांदा आपण ती यात्रा आपल्या गाडीतून करू.’’ निखिलने असं म्हटल्यावर दोघांच्या अश्रूंचा बांध फुटला. धाकट्या गणेशची अवस्थाही वेगळी नव्हती.
गणेश तीन वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू झाला होता. आईवर तर आभाळ कोसळले होते. सहा आणि तीन वर्षांची मुलं पदरात असल्यामुळे तिने मन घट्ट केलं. काही महिने ती दुसऱ्यांच्या शेतावर मजुरीने जाऊ लागली. मात्र, रोज काम मिळेल, याची खात्री नसायची. त्यामुळे अनेकदा तिघांनाही उपास घडायचे. मग दहा किलोमीटरवरील खेड- शिवापूरजवळील एका मसाल्याच्या कारखान्यात तिने नोकरी धरली. रोजच्या प्रवासासाठी दहा रुपये लागायचे. मात्र, ते वाचवण्यासाठी सकाळी लवकर उठून, मुलांचा स्वयंपाक करून, ती चालतच कारखाना गाठायची. अनेकदा तिला उशीर व्हायचा, अशावेळी अक्षरशः धावत - पळत ती कारखाना गाठायची. थोडा उशीर झाला तरी दिवसाचा निम्मा पगार बुडायची भीती वाटायची. पायातील चप्पल झिजायची, तुटायची पण तिने कधी लवकर नवीन चप्पल घेतली नाही. सुदैवाने तिच्या या संघर्षाचे दोन्ही मुलांनी चीज केले. थोरला मुलगा निखिल एमएस्सी होऊन, खासगी कंपनीत अधिकारी झाला तर धाकट्या गणेशने ‘बीफार्म’ होऊन, स्वतःचं मेडिकल टाकलं. आपल्या आईचे कष्ट व त्याग दोन्ही मुले जवळून पाहत होती. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. तेवढ्यात गणेशने दोन बॉक्स आईसमोर ठेवले.
‘‘आई, उद्या अष्टविनायकाच्या यात्रेला चपलांचा नवीन जोड घालून जायचं बरं का? नाहीतर अनवाणी किंवा फाटक्या चपला घेऊन निघशील.’’ गणेशने चेष्टेच्या सुरात म्हटले.
‘‘आमच्यासाठी तू आयुष्यभर काबाडकष्ट केलेस. आता इथूनपुढं फक्त आराम करायचा आणि आम्हाला हुकूम सोडायचास.’’ निखिलने म्हटले.
‘‘गणेश, दुसऱ्या बॉक्समध्ये काय आहे?’’ आईने उत्सुकतेने विचारले.
‘‘आम्हाला सतत प्रेरणा देणारी, कष्टांचं मूल्य वाढवणारी आणि त्यागाचं प्रतिक असणारी वस्तू आहे.’’ असं म्हणून निखिलने बॉक्स उघडला. त्यात आईच्या जुन्या फाटलेल्या चपला होत्या. चपलांचे झिजलेले तळवे, ठिकठिकाणी मारलेल्या छोट्या चुका आणि तुटलेले दोन्ही अंगठे पाहून तिघांनाही गलबलून आले.
‘‘आई, तुझ्या या चपला आम्ही मुद्दाम जपून ठेवल्या आहेत. तू केलेल्या कष्टांची जाणीव आम्हाला सतत राहावी, हा उद्देश त्यामागे आहे.’’ निखिल म्हणाला. आईने त्या फाटक्या चपला छातीशी कवटाळल्या व म्हणाली, ‘‘बाळांनो, तुम्ही माझ्या कष्टाचं चीज केलंत. एखाद्या आईच्या आयुष्यात याच्यापेक्षा आनंदाचा क्षण कोणता असू शकतो? मी तुमची आई आहे, याचा मला फार अभिमान वाटतो.’’ असे म्हणून तिने अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79169 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top