कोरोना ‘झोपी गेलेला जागा झाला’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना ‘झोपी गेलेला जागा झाला’!
कोरोना ‘झोपी गेलेला जागा झाला’!

कोरोना ‘झोपी गेलेला जागा झाला’!

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा वेग नऊ आठवड्यांपासून सातत्याने वाढत आहे. एप्रिलच्या मध्यावधीला एका आठवड्यात ३६७ असलेला नवीन रुग्णांचा आकडा, जूनच्या मध्यावधीपर्यंत १६ हजारांहून जास्त वाढला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. या वाढत्या आकड्यांकडे दुर्लक्ष करू नका. घाबरू नका मात्र, काळजी घ्या, असे आवाहनही खात्यातर्फे करण्यात आले आहे.
राज्यात गेल्या सव्वादोन वर्षांमध्ये कोरोनाच्या तीन लाटांचा उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटमुळे आलेल्या तिसरी लाटेची तीव्रता एप्रिलपर्यंत संपली. त्यामुळे ११ ते १७ एप्रिल या आठवड्यात राज्यात फक्त ३६७ नवीन रुग्ण आढळले. मात्र, त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येचा आकडा वाढत असल्याचे निरीक्षण नोंदले जात आहे.

कशी वाढली रुग्णसंख्या?
आठवडा ..................... रुग्णसंख्या
१८ ते २४ एप्रिल ........ ९३७
२५ एप्रिल ते १ मे ...... ९७६
२ ते ८ मे ................ १२८५
९ ते १५ मे .............. १४४१
१६ ते २२ मे ............ १८३३
२३ ते २९ मे ............ २९३४
३० मे ते ५ जून ....... ६८२२
६ ते १२ जून .......... १६३४४

आरोग्य खात्याचे निरीक्षण
- शेवटच्या दोन आठवड्यांत दुपटीपेक्षा जास्त रुग्णसंख्या वाढली
- ११ ते १७ एप्रिलच्या तुलनेत ६ ते १२ जूनमध्ये सुमारे १६ हजारांनी रुग्णांचा आकडा वाढला
- २८ मार्च ते ३ एप्रिलच्या आठवड्यात रुग्णसंख्या ७७५ होती. ती एप्रिलच्या मध्यावधीपर्यंत ९३७ पर्यंत कमी झाली.
- राज्यात १२ मे रोजी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के होते. ते १२ जूनपर्यंत ९७.९२ टक्क्यांपर्यंत खाली आले.

कोरोनाच्या लाटा
राज्यात जानेवारीपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा उद्रेक झाला. त्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मात्र, या व्हेरियंट श्वसनसंस्थेच्या वरच्या भागापुरताच मर्यादित राहिला. यापूर्वी पहिल्या लाटेत आलेल्या अल्फा आणि दुसऱ्या लाटेत थैमान घातलेल्या डेल्टा व्हेरियंटचे रुग्णांचे थेट फुफ्फुसावर हल्ला केला होता. त्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील ओमिक्रॉन व्हेरियंट सौम्य असल्याचे जाणवले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागली नाही. त्यानंतर मार्चपासून रुग्णसंख्या सातत्याने कमी होऊ लागली. मात्र, आता परत वाढत आहे. त्यामागे विषाणूंमध्ये झालेला बदल हे महत्त्वाचे कारण आहे.

का वाढ झाली?
- कोरोनाची साथ आता एन्डामिक झाली आहे. याचा अर्थ, अशा प्रकारचे कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळत राहतील.
- सध्या आढळणारे रुग्णांना ओमिक्रॉन याच व्हेरियंटचा संसर्ग होत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नाही.

काय काळजी घ्यावी?
- नागरिकांनी कोरोना संसर्गाबाबत हलगर्जीपणा करू नये
- गर्दीच्या ठिकाणी, रुग्णालयात, दवाखान्यात जाताना मास्क वापरावा
- राज्याचे मास्कची सक्ती केली नसली तरीही सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर करावा
- कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी
- वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुवावे
- नाक, तोंड याला वारंवार हाताने स्पर्श करू नये

आकडे बोलतात
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण : ९७.९२ टक्के

राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर : १.८६ टक्के
कोरोना संसर्गाचा दर : ९.७३ टक्के
आतापर्यंत तपासण्यात आलेले प्रयोगशाळा नमुने : ८,१३,२१,७६८
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या : ७९,१०,५७७
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या : १६,३७०

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही, हा मोठा दिलासा आहे. आजही रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. बी.ए.४ आणि ५ हे ओमायक्रोन कुटुंबातील विषाणू आहेत. त्यामुळे त्याच्या वाढीला मर्यादा आहे,असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण आपल्याकडील तिसरी लाट ही ओमायक्रोनमुळेच आलेली होती. मात्र, तरीही आपण काळजी घेणे आवश्यक आहे आणि अतिजोखमीच्या आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्व्हेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, महाराष्ट्र

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79191 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top