
बनावट एसएमएसव्दारे वीज ग्राहकांची लूट
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १३ : वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ पाठवून संपर्क साधण्यास सांगणे. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे व त्याला वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार शहरात घडत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या बनावट ‘एसएमएस’ला कोणताही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
काही दिवसांपासून वीज ग्राहकांना बनावट एसएमएस पाठवून ऑनलाइन लुबाडण्याचे प्रकार घडत आहे. यासोबतच महावितरणनेही बनावट ‘एसएमएस’प्रकरणी सायबर सेलमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करणार आहे. त्यासाठी सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट ‘एसएमएस’ नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. मात्र, कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्सअप मेसेज पाठविण्यात येत नाहीत, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
अशी केली जाते फसवणूक
१) महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’(MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. या अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळविले जात नाही.
२) ‘वीजबिलाची रक्कम भरलेली नसल्याने वीजपुरवठा आज रात्री खंडित करण्यात येत आहे’, असा संदेश वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येत आहेत.
३) या मेसेजनंतर वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठविण्यात येते. तसेच ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते.
४) ग्राहकांनी त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून बॅंक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्याची मोठी शक्यता आहे.
नोंदणी केलेल्यांनाच ‘एसएमएस’
महावितरणकडून मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम,
स्वत:हून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते.
काय काळजी घ्यावी...
सध्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट आहे. त्यास प्रतिसाद देऊ नये. बिलाच्या पेमेंटसाठी लिंक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये. तसेच मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये.
तक्रारीसाठी येथे साधा संपर्क
वीजग्राहकांनी २४ तास सुरु असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79286 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..