‘फास्टटॅग’ची यंत्रणा रद्दाड! वाहनधारकांकडून अधिक रक्कमेची वसुली; वाहन घरीच असतानाही टोल कपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘फास्टटॅग’ची यंत्रणा रद्दाड!
वाहनधारकांकडून अधिक रक्कमेची वसुली; वाहन घरीच असतानाही टोल कपात
‘फास्टटॅग’ची यंत्रणा रद्दाड! वाहनधारकांकडून अधिक रक्कमेची वसुली; वाहन घरीच असतानाही टोल कपात

‘फास्टटॅग’ची यंत्रणा रद्दाड! वाहनधारकांकडून अधिक रक्कमेची वसुली; वाहन घरीच असतानाही टोल कपात

sakal_logo
By

पुणे, ता. १३ वाहन घरीच असताना टोल कपात होणे, बँक खात्यांत रक्कम शिल्लक असताना देखील टोल कपात न होणे, तर कधी खाते ‘इनॲक्टिव्ह’ असल्याचे सांगत जेवढा टोल तितकाच दंड वसूल केला जात आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सातारा मार्गावरील खेड शिवापूरचा टोल नाका असो की, मुंबई मार्गावरील सोमाटणे फाट्यावरील टोलनाका असा, सगळीकडे परिस्थिती सारखीच!

वाहनधारकांना टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबायला लागू नये यासाठी राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर ‘फास्टटॅग’ची प्रणाली सुरु केली आहे. त्यासाठी स्वतंत्र लेन असली तरीही त्यावरही वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यांच्याकडे ‘फास्टटॅग’ नाही, अशा वाहनधारकांकडून रोख टोल वसूल केला जातो. तसेच त्यांच्याकडून दंडही वसूल केला जात असून हे अन्यायकारक आहे. कारण बऱ्याचदा टोल प्रशासनाच्या चुकीमुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

‘फास्टटॅग’बाबतच्या तक्रारी
उशिराने पैसे कट होणे, खात्यांत रक्कम शिल्लक असतानाही ते इनॲक्टिव्ह किंवा ब्लॅकलिस्टेड दाखविणे, आदी प्रकारामुळे वाहनधारकांकडून टोलसोबत दंडही देखील वसूल केला जात आहे. कार्ड रीड झाल्यानंतर अर्ध्या तासात वाहनधारकांच्या खात्यांवरून रक्कम वसूल केली जाते. म्हणजे एका वाहनधारकाकडून तीन टोलची रक्कम वसूल केली जाते आहे.

‘फास्टटॅग’बाबत ५ ते १० टक्के तक्रारी
मुंबई द्रुतगती मार्गावर तीन टोल नाके आहेत. तर पुणे-कोल्हापूर मार्गावर चार टोल नाके आहेत. कोल्हापूर मार्गावर खेड शिवापूर टोल नाक्यावरून दररोज सरासरी ६० ते ७० हजार वाहने धावतात. तर मुंबई मार्गावरून ७० ते ७२ हजार वाहने धावतात. शनिवार व रविवारी ही संख्या ९० हजारांच्या आसपास असते. यात ‘फास्टटॅग’च्या तक्रारींचे प्रमाण ५ ते १० टक्के इतके आहे.

त्रुटी काय आहेत?
लेनच्या बूम जवळ वाहन आल्यास सीसीटीव्ही कॅमेरा वाहनावरील ‘फास्टटॅग’चे कोड रीड करतो. त्यानंतर वाहनधारकांच्या खात्यांच्या ‘वायलेट’मधून तेवढी रक्कम वसूल केली जाते. आता टोलचा रिचार्ज देखील करता येतो. रिचार्ज झाल्यावर ती रक्कम टोलचा कर म्हणून वसूल होते. यातील त्रुटी म्हणजे या यंत्रणेतील सीसीटीव्ही कॅमेरे तुलनेने कमी क्षमतेचे आहेत. तसेच कारवर एकापेक्षा अधिक ‘फास्टटॅग’चे स्टिकर्स असतील, तर रीड करण्यात गोंधळ होतो. या त्रुटी दूर केल्या पाहिजे.

सिंगापूरची व्यवस्था भारतात कधी?
सिंगापूरमध्ये टोल प्लाझाच्या ठिकाणी मोठ्या कमानी उभारल्या आहेत. या टोल प्लाझातून वाहन कधी निघून गेले हे कळत देखील नाही. शिवाय ही यंत्रणा मनुष्यविरहीत आणि अद्ययावत आहेत. अशी यंत्रणा भारतातील टोलनाक्यांवर उभारण्याची गरज आहे.


टोल नाक्यांवरची यंत्रणा तकलादू आहे. त्यामुळे वाहनधारकांना ‘फास्टटॅग’ असूनही रांगेत थांबणे अथवा कॅश भरावी लागण्यासारखे प्रकार घडतात. हे चुकीचे व चीड निर्माण करणारे आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यात लक्ष देणे गरजेचे आहे.
-विवेक वेलणकर, टोल अभ्यासक, पुणे.

वाहनधारकाच्या खात्यात २०० रुपयांपेक्षा कमी रक्कम असल्यास ‘फास्टटॅग’मधून ती कपात होत नाही. त्यामुळे वाहनधारकांनी त्याच्यापेक्षा अधिक रक्कम खात्यात ठेवावी. खाते ‘ब्लॅक लिस्टेड’ झाले असल्यास यात आमचा काही दोष नाही. ती समस्या बँकेची आहे.
-संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे विभाग.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79462 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top