
‘चांगल्या शैक्षणिक पातळीसाठी सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज’
पुणे, ता. १३ : ‘विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, शिक्षकांशी संवाद, लिखाणाचा सराव यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये विद्यार्थी मागे पडताना दिसतात. त्यामुळे सातत्यपूर्ण अभ्यासाने एक चांगली शैक्षणिक पातळी विद्यार्थी गाठू शकतात,’ असे मत शैक्षणिक समुपदेशिका मंजूषा वैद्य यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र ब्राह्मण सभेतर्फे इयत्ता नववी आणि दहावीकरिता ‘गरज अभ्यासाच्या नियोजनाची’ विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. यावेळी वैद्य बोलत होत्या. गणित विषयात मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. जयश्री अत्रे, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक डॉ. सुलभा विधाते, भाषा विषयात मार्गदर्शन करणाऱ्या सुवर्णा कऱ्हाडकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले.
‘गणिताचा अभ्यास करताना सराव आणि अलीकडील इयत्तेत शिकलेल्या संकल्पना पक्क्या करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होते’, असे डॉ. अत्रे यांनी सांगितले, तर ‘कोणत्याही भाषेचा ‘व्याकरण’ हा कणा आहे. त्यामुळे व्याकरण पक्के करण्याचा निर्धार करा,’ असा सल्ला कऱ्हाडकर यांनी दिला.
डॉ. विधाते म्हणाल्या, ‘‘शास्त्रामध्ये संशोधक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करा, म्हणजे विज्ञान विषय शिकताना अधिक आनंद मिळेल.’’
यावेळी सभेचे अध्यक्ष प्रकाश दाते, कार्याध्यक्ष अतुल व्यास, सचिव अभिजित अग्निहोत्री आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संयोगिता पागे यांनी केले.
-------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79482 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..