बस, एसटी, रेल्वे स्थानकांचे परिसर असुरक्षित ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस, एसटी, रेल्वे स्थानकांचे परिसर असुरक्षित !
बस, एसटी, रेल्वे स्थानकांचे परिसर असुरक्षित !

बस, एसटी, रेल्वे स्थानकांचे परिसर असुरक्षित !

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः रात्रीच्यावेळी चोरट्यांकडून शोधले जाणारे सावज, मद्यपींकडून सर्वसामान्यांना केली जाणारी शिवीगाळ, दमदाटी, रिक्षाचालकांकडून होणारी अडवणूक व टवाळखोरांचा दिवसेंदिवस वाढत जाणारा वावर, अशा असंख्य घटनांचा अनुभव शहरातील बस व रेल्वे स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांना येत आहे. स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथील बस, एसटी स्थानकांचा परिसरही रात्रीच्यावेळी निवारा शोधणाऱ्या प्रवाशांसाठी असुरक्षित बनू लागल्याची सद्यःस्थिती आहे.

स्वारगेट परिसरामध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास एका महिलेवर चालकाने बसमध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्वारगेट पोलिसांनी संबंधित घटनेतील आरोपीस तत्काळ बेड्या ठोकल्या. असे असले तरीही या घटनेमुळे बस, रेल्वे व एसटी स्थानकांवरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागला आहे. रात्रीच्यावेळी रेल्वे, एसटी, पीएमपी, खासगी बसस्थानकांवर बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात. रात्रीच्यावेळी भितीपोटी प्रवाशांकडून स्थानके किंवा जवळच्याच परिसरात वास्तव्य केले जाते. रात्री किंवा पहाटेच्यावेळी संबंधित ठिकाणी पोलिसांची गस्तीची एक फेरी होते. त्यानंतर मद्यपी, टवाळखोर व चोरट्यांकडून सर्वसामान्य प्रवाशांना त्रास दिला जातो.

रिक्षास्टॅंड, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही किरकोळ कारणांवरून दमदाटी, शिवीगाळीसारख्या प्रकारांना प्रवाशांना सामोरे जावे लागते. दिवसा पीएमपी, एसटी, रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पैसे, दागिन्यांसह मौल्यवान वस्तू चोरण्याच्या घटना घडतात.
--------------------
रात्रगस्तीवरील पोलिसांचा वावरही कमी
पुणे रेल्वे स्थानकात एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना मागील वर्षी घडली होती. पुणे स्टेशन बसस्थानक परिसरात रात्रीच्यावेळी प्रवाशांच्या लुटीच्या घटनाही वारंवार घडतात, तर स्वारगेट एसटी, बस स्थानकाच्या परिसरात चोरीच्या घटना घडत असून प्रवाशांवर वार करुन लुटण्याचेही प्रकार घडले आहेत. स्वारगेट येथेच मागील वर्षी एका प्रवाशाला लुटून त्याचा खून केल्याचा, एका दिव्यांग तरुणीला उचलून नेऊन जनता वसाहत परिसरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचीही घटना घडली आहे. असे गंभीर गुन्हे बस, रेल्वे व एसटी स्थानकांच्या परिसरात घडत आहेत. त्यामुळे संबंधित ठिकाणे रात्रीच्यावेळी महिलांसाठी अजूनही असुरक्षितच असून, तेथे रात्रगस्तीवरील पोलिसांचा वावरही तुलनेने कमी असल्याची सद्यःस्थिती आहे.
------------
कामानिनिमित्त मुंबईला जावे लागते. तेथून रात्रीच्यावेळी पुणे स्टेशन येथे उतरताना मध्यरात्र होते. त्यावेळी स्टेशनच्या परिसरात मद्यपी, चोरट्यांचा वावर असल्याने अनेकदा भीती वाटते. - विजय माने, वाघोली
-----------
स्वारगेट, पुणे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी रात्री व दिवसा पोलिसांची गस्त पथके सक्रिय आहे. त्यामुळे चोरटे, गुन्हेगारांवर तेथे वचक बसलेला आहे. नागरिकांनीही कुठलीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ ११२ या क्रमांकावर तत्काळ माहिती दिल्यास अशा घटनांवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल. - सागर पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन
------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79504 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top