
सलमान खान धमकीप्रकरणी गॅंगस्टर बिष्णोईची चौकशी
पुणे, ता. १३ ः अभिनेता सलमान खान व त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठविणाऱ्या गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याची चौकशी आता महाराष्ट्र पोलिस करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे पथक दिल्लीला गेले आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) कुलवंतकुमार सरंगल यांनी सोमवारी दिली. दरम्यान, सलमान खान धमकी प्रकरणाची पूर्ण माहिती सिद्धेश कांबळे ऊर्फ महाकाल यास होती, असेही त्यांनी सांगितले.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाची जबाबदारी घेणाऱ्या गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई यानेच अभिनेता सलमान खान व सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठविल्याची घटना यापूर्वी घडली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे गुन्हाही दाखल आहे. त्यादृष्टीने मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. दरम्यान, मुसेवाला खून प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांनी जाहीर केलेल्या आठ शार्प शुटरपैकी संतोष जाधव व सिद्धेश कांबळे ऊर्फ महाकाल यांच्यासह नवनाथ सूर्यवंशी या तिघांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
दरम्यान, संतोष जाधव व नवनाथ सूर्यवंशी या दोघांना अटक केल्यानंतर अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरंगल म्हणाले, ‘‘महाकालला अटक केल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी सलमान खान धमकी प्रकरणाची चौकशी केली. तेव्हा, त्याला धमकीच्या घटनेची पूर्ण माहिती असल्याचे समजले. त्यावरुन पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक खोलवर तपास करण्याचे ठरविले आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक लॉरेन्स बिष्णोईची चौकशी करणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे पथकही दिल्लीत तपास करत आहे.’’
---------
बिष्णोई टोळीचे जाळे देशभर
लॉरेन्स बिष्णोई टोळीचे सक्रिय सदस्य देशभरात आहेत. त्यामध्ये सातशेहून अधिक व्यक्तींचा सहभाग आहे. ते एकमेकांना प्रत्यक्षात भेटत नाहीत, मात्र इन्स्टाग्राम, फेसबुक अशा समाजमाध्यमांद्वारे ते एकमेकांच्या संपर्कात येतात व पुढील कट रचतात. महाकाल हा इन्स्टाग्राममार्फत बिष्णोई व गोल्डी बरारशी जोडला गेला होता.
-----------------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79580 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..