मानसोपचार तज्ज्ञ गेले मानसोपचार तज्ज्ञाकडे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानसोपचार तज्ज्ञ गेले
मानसोपचार तज्ज्ञाकडे!
मानसोपचार तज्ज्ञ गेले मानसोपचार तज्ज्ञाकडे!

मानसोपचार तज्ज्ञ गेले मानसोपचार तज्ज्ञाकडे!

sakal_logo
By

स्थळ ः मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश यांचा दवाखाना.
काळ ः सोकावलेला
वेळ ः भयानक

‘‘बोला काय प्रॉब्लेम आहे?’’ डॉक्टर अविनाश यांनी समोरच्या पेशंटला विचारलं.
‘‘डॉक्टरसाहेब, आमच्या नळाला सकाळी पाणीच येत नाही. त्यामुळे मला रोज अंघोळीला उशीर होतो.’’ सूरजने प्रॉब्लेम सांगितला.
‘‘तुम्ही एका मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडे आला आहात, याचे भान ठेवा. तुमच्या घरगुती अडचणी मला सांगू नका.’’
‘‘तुम्हीच काय प्रॉब्लेम आहे, असं विचारलंत. मला वाटलं तुम्ही घरगुती अडचणींविषयी विचारताय म्हणून सांगितलं.’’ सूरजनं खुलासा केला.
‘‘तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल सांगा.’’ डॉक्टरांनी प्रश्‍न फिरवला.
‘‘डॉक्टरसाहेब, डोक्यात पार उलटेसुलटे विचार येतात हो. ते विचार थांबतच नाहीत. त्यामुळे डोकं अगदी गरगरून जातं. हात-पाय थरथर कापतात, अनेकदा चक्करही येते.’’ सूरजने आपली कैफियत मांडली.
‘‘तुम्ही दारू वगैरे काही पिता.?’’ डॉक्टरांनी विचारले.
‘‘होऽऽहोऽऽ पितो...पण आता लगेच नको. तुम्ही मला तपासून गोळ्या वगैरे दिल्यानंतर पिईन. साहेब, तुमच्यासारखे पेशटंची एवढी काळजी घेणारा डॉक्टर माझ्या पाहण्यात नाही. तुम्हाला सलाम! पण तुम्ही कोणत्या ब्रॅंडची ठेवता?’’ सूरजने विचारले.
‘‘तुम्ही दारू वगैरे पिता का? हा माझा प्रश्‍न आहे. आमंत्रण नाही. दारूमुळे तुम्हाला हा त्रास होतो का, हे मला पहायचे होते.’’ डॉक्टरांनी म्हटले.
‘‘हे आधी नाही का सांगायचं, उगाचंच पेशंटच्या अपेक्षा वाढवून ठेवायच्या, याला काय अर्थ आहे का?’’ सूरजने नाराजीने म्हटले.
‘‘बरं तुम्हाला नैराश्‍य येतं म्हणजे काय होतं? तुमच्या मनात नक्की कसले विचार येतात?’’ डॉक्टरांनी विचारले.
‘‘डॉक्टरसाहेब, केवळ विचारच येत नाहीत, तर विचारांची साखळी तयार होते व मनात रुंजी घालत असते.’’ सूरजने म्हटलं.
‘‘तुमच्या मनात येणाऱ्या विचारांचं एखादं उदाहरण देऊन स्पष्ट करा म्हणजे मला उपचार करायला सोपं जाईल.’’ डॉक्टरांनी म्हटलं.
‘‘तुमच्या दवाखान्यामध्ये मी आज आलो, त्यावेळी येथं एकही पेशंट नव्हता. तुम्ही पेशंटची वाट पाहत बसलेले मला दिसले. त्यावेळी माझ्या मनात विचार आले, की डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये तर एकही पेशंट नाही. त्यांचा उदरनिर्वाह कसा होत असेल? दवाखान्यात दिवसभर पेशंटची वाट बघत बसून, त्यांना कंटाळा येत नसेल का? एक रुपयांची कमाई झाली नसताना ते बायको-मुलांना कसे तोंड दाखवत असतील? ‘एक रुपया कमवायची अक्कल नाही, किती दिवस तुम्हाला फुकटचं खायला घालू’ असं म्हणून त्यांची बायको सतत भांडत असेल, दररोज डॉक्टर या प्रसंगाला कसे तोंड देत असतील? डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले असतील, त्यानंतर दवाखाना बांधण्यासाठीही त्यांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढले असेल? या कर्जाचे हप्ते ते कसे भागवत असतील? कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बॅंकेचे वसुली एजंट व खासगी सावकार तगादा लावत असतील. ते त्यांना दमदाटीही वा प्रसंगी मारहाण करीत असतील, त्यावेळी डॉक्टरांची काय अवस्था होत असेल? यातून डॉक्टरसाहेबांना रोज नैराश्‍य येत असणार. या नैराश्‍यातूनच त्यांनी आत्महत्या केली तर त्यांच्या बायको- मुलांचं कसं होणार?...’’
सूरजचं बोलणं ऐकून डॉक्टरांनी दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून ठेवलं. ‘मी तर याचा कधी विचारच केला नाही,’ असं म्हणून ते शून्यात नजर लावून बसले. आता डॉक्टर दुसऱ्या एका मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79908 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top