
प्रासंगिक
हिरालाल किराड ः एक कृतीशील कर्मयोगी
एक सच्चे समाजसेवक म्हणून हिरालाल किराड यांचा पुणे शहरात लौकिक आहे. पुण्याच्या लघुउद्योगात आणि महापालिकेत त्यांनी केलेले कार्य पुण्याच्या इतिहासात भर घालणारे आहे. १६ जून १९२४ ला त्यांचा जन्म झाला. पिताश्री शंकरराव व माता गोदावरीबाई यांच्या आठ मुलांपैकी हिरालाल हे ज्येष्ठ पुत्र होत. शंकररावांचा इमारती लाकडांचा (टिंबर मर्चंटचा) व्यवसाय होता. रेसकोर्स व रॉयल टर्फ क्लब हे त्यांचे मोठे ग्राहक होते. व्यवसायाच्या निमित्ताने रेसकोर्सला शंकररावांचे जाणे-येणे होते. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांशी त्यांचे संबंध होते. त्यांच्या संगतीने शंकररावांना रेस खेळण्याचा छंद जडला. त्या छंदात भरभराटीला आलेला शंकररावांचा टिंबर मर्चंटचा धंदा बसला ते १९३९ चे साल होते. त्या वेळी हिरालालजीचे वय अवघे १५ वर्षांचे होते. ते मॅट्रिकच्या वर्गात शिकत होते. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. कुटुंब मोठे असल्याने चरितार्थासाठी कुमारवयातच हिरालालजींवर नोकरी करण्याची वेळ आली. मुंढवा येथील डेक्कन पेपर मिलमध्ये बिनपगारी शिकाऊ कामगार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांना सहा आणे रोज मिळायला लागले. वडिलांनी घेऊन दिलेल्या जुन्या सायकलीवर ते १४ किलोमीटर मुंढवा येथे जायचे. मिलच्या इंजिनिअरिंग वर्कशॉपचे इन्चार्ज पेपरवाला नावाचे गृहस्थ होते. हिरालालजींचे चोख काम पाहून ते खूष झाले. त्यांनी महत्त्वाची कामे त्यांच्यावर सोपवली. दोन वर्षांनंतर हिरालालजींनी डेक्कन पेपर मिलची नोकरी सोडली. नंतर ते १९४१ मध्ये ॲम्युनिशन फॅक्टरीत कामाला लागले. दुसरे महायुद्ध चालू असल्याने दारूगोळा फॅक्टरीत २४ तास काम चालायचे. हिरालाल मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात काम करायचे; तेथे त्यांना चांगले शिक्षण मिळाले. त्यांच्या उत्कृष्ट कामाबाबत दारूगोळा फॅक्टरीचे बडे इंग्रज अधिकारी खूष असत. शालेय क्रिकेट संघात त्यांनी अष्टपैलू खेळाचा दबदबा निर्माण केला होता. रणजी ट्रॉफी खेळाडू रंगा साहेनी हे ॲम्युनिशन फॅक्टरी क्रिकेट संघाचे कप्तान होते. त्यांनी हिरालालजींचा क्रिकेट संघात समावेश केला.
बेव्हीन ट्रेनिंग योजनेत निवड झालेल्या उमेदवारांना इंजिनिअरिंगच्या पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले जाई. एक वर्ष प्रशिक्षण असे. कुशाग्र बुद्धीचे हिरालालजी हे पात्र ठरले; परंतु महायुद्ध चालू असल्याने आई-वडिलांनी त्यास जाण्यास विरोध केला. आपल्या परिश्रमाच्या जोरावर ते फॅक्टरीत सुपरवायझरच्या पदापर्यंत पोचले. त्या काळात रावसाहेब किराड हे पुण्यातील एक दानशूर श्रीमंत नेते होते. ब्रिटिश अधिकारी व भारतीय पुढाऱ्यांची त्यांच्या घरी ऊठबस होती. हिरालालजींची धडपड बुद्धी, प्रतिभा गुण व उज्वल भविष्याकडे त्यांची चाललेली वाटचाल पाहून रावसाहेब व त्यांच्या धर्मपत्नी सेवाबाई यांनी आपली मुलगी कस्तुरबाई यांचा हिरालालजींशी विवाह ठरविला. २३ फेब्रुवारी १९४७ मध्ये त्यांचा विवाह रावसाहेबांच्या ‘हिरा-मॅन्सन’मध्ये मोठ्या थाटामाटात साजरा झाला.
हिरालालजींनी पाच वर्षे ॲम्युनिशन फॅक्टरीत नोकरी केली. पुढे त्यांनी १९४६ मध्ये कुस्रो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये मशिनिस्ट इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले. वर्कशॉपचे सुपरिटेंडेट श्री. शेळके होते. त्यांनी व हिरालालजींनी छोटे स्टीम इंजिन फावल्या वेळात तयार केले. त्याचे छोटे स्पेअरपार्ट स्वतः तयार करून त्याची जोडणी केली. अकरा महिन्यांत हे काम त्यांनी पूर्ण केले. वाडिया कॉलेजचे प्रिन्सिपॉल प्रा. जोग व व्हॉइस प्रिन्सिपॉल प्रा. -- यांनी त्यांच्या या यंत्रकलेचा गौरव केला. स्टीम इंजिन कॉलेजच्या असेंब्ली हॉलमध्ये ठेवण्यात आले. १९४९ मध्ये हिरालालजींनी वाडिया कॉलेजची नोकरी सोडली. नंतर त्यांना राठी इंजिनिअरिंगमध्ये वर्क्स मॅनेजरची जागा मिळाली. या जागेवर त्यांनी १३ वर्षे नोकरी केली. स्वतःचा उद्योग करावा असे विचार हिरालालजींच्या मनात होते; पण राठीबंधू त्यांना सोडायला तयार नव्हते. अखेर एक अपघाताचे निमित्त झाले आणि निर्धार करून हिरालालजींनी राठीबंधूंची नोकरी १९६२ मध्ये सोडली. नोकरी सोडल्यावर श्री. डी. डी. नावाच्या गृहस्थांच्या शिवाजीनगरमधील जागेत हिरालालजींनी स्वतःचा भागीदारीत मॉडर्न स्टील क्राफ्ट या नावाने स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्यांना ठाणे येथील मर्फी इंडिया लि.चे मोठे काम मिळाले. अतिशय जिद्दीने हिरालालजींनी ते काम पूर्णत्वास नेले. व्यवसाय भरभराटीला येत असताना १९७० मध्ये कामगारांचा संप झाला. त्यामुळे अखेर कारखाना बंद करावा लागला. नंतर विनायकराव साळुंखे यांच्या नाना पेठेतील जागेत हिरालालजींनी हिराक-स्टील क्राफ्ट नावाचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. किर्लोस्कर ऑइल इंजिन, रस्टन, किर्लोस्कर न्यूमॅटिक या नामवंत कंपन्यांच्या स्पेअर पार्ट बनविण्याच्या ऑर्डर हिरालालजींना मिळाल्या. हिरालालजी व त्यांचे बंधू मदनलाल हे रात्रंदिवस राबून आपल्या व्यवसायात त्यांनी भरभराट केली.
सामाजिक कार्य करण्याचा त्यांचा पिंड होता. कस्तुरबाईंचे बंधू भाऊसाहेब किराड १९५२ मध्ये समाजवादी पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीत उभे होते. त्यांच्या प्रचाराची धुरा हिरालालजींनी सांभाळली. १९५२ मध्ये धाकट्या भगिनीचे पती सरदार किराड यांना महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवून देण्यात हिरालालजींनी जिवापाड मेहनत घेतली. तेव्हापासून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. ‘सकाळ’चे संस्थापक कै. नानासाहेब परुळेकर यांच्या नागरी संघटनेशी हिरालालजींचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. १९७४ मध्ये नागरी संघटनेचे उमेदवार म्हणून हिरालाल उभे राहिले व चांगल्या मताधिक्याने निवडून आले. १९७८ मध्ये पीएमटीचे चेअरमन झाले. त्यांच्या कारकिर्दीत कॅम्पमधील महात्मा गांधी बसस्थानकाची निर्मिती झाली. बसस्थानकाचे उद्घाटन करताना त्या वेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी हिरालालजींचा मुक्तकंठाने गौरव केला. १९८१ मध्ये लघुउद्योग संघटनेची पुण्यात स्थापना झाली. लघुउद्योगावर केंद्र सरकारने बसविलेली एक्साइज ड्युटी हिरालालजींमुळे माफ झाली. १९८२ मध्ये त्यांनी टायनी इंडस्ट्रिअर को-ऑप. इस्टेटची स्थापना केली. त्याकरिता कोंढवा बु।। येथे २१ एकर जागा खरेदी केली. ती जागा कमाल जमीन धारणा कायद्यातून वगळण्यात हिरालालजींनी मोलाची कामगिरी बजावली. हिरालालजींच्या पत्नी सौ. कस्तुरबाई यांना प्रवासाची विलक्षण आवड होती.
ग्वालियला -- त्यांचे भाचे जावई गुलाबसिंग यांच्या निवासस्थानी मुक्कामास असताना विजेचा शॉक लागून कस्तुरबाईंचे दुःखद निधन झाले. हिरालालजींना साथ करणाऱ्या कस्तुरबाई २ एप्रिल १९८१ रोजी अनंतकाळच्या प्रवासाला निघून गेल्या. आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ १९८२ मध्ये कै. सौ. कस्तुर हिरालाल किराड ट्रस्टजी स्थापना केली. आज ४१ वर्षे झाली तरी ट्रस्टचे कार्य पुण्यात मोठ्या जोमाने चालू आहे. रुग्णांसाठी लागणाऱ्या रुग्णोपयोगी साधनांचे नाममात्र दरात -- देण्याकरिता १९८६ मध्ये ‘रुग्ण - सेवालय’ची स्थापना करण्यात आली. अपंगांना अपंगत्व निवारक साधनेही ट्रस्टच्या वतीने देण्यात येतात.
त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुणे मनपाने त्यांना २८ जानेवारी २००८ रोजी मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. अशा या कर्मयोगीला आमचा -- नमन...
सुनील मदनलाल किराड
(वेळ ः ८-००)
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m79922 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..