शाळा पुन्हा गजबजली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा पुन्हा गजबजली!
शाळा पुन्हा गजबजली!

शाळा पुन्हा गजबजली!

sakal_logo
By

घरात गेली दोन वर्षे कोंडली गेलेली मुले प्रत्यक्ष शाळेत आली. शारीरिक शिक्षणाचा विषय शिकवत असल्याने मला तर मोकळ्या मैदानावरच दिवस काढण्याची सवय. पण आता तो झाकोळलेला कालखंड संपला. शाळा सुरू झाल्या. शिक्षकांना प्रत्यक्ष पाहून लहानग्यांनी हर्षोल्लास केला. पहिली-दुसरीच्या मुलांनी प्रत्यक्षात पहिल्यांदाच शिक्षकांना पाहिले. दोन वर्षे स्क्रीनवर पाहिलेली व्यक्ती समोर दिसल्यावर त्यांना खूप आनंद झाला. ‘हाय मैम’, ‘हेल्लो मैम’ करत हाका मारू लागली. त्यांचे आनंदी चेहरे पाहून आम्ही शिक्षक अगदी खुळेच झालो. तुमचा तास कधी आहे म्हणून आतुर झाली ही मुले. हा अगदी वेगळाच अनुभव. शाळेत येणारे पालक आदरयुक्त नजरेने पाहात होते. ऑनलाइन शिक्षणाच्या वेळी त्यांनी जवळून आपल्या पाल्याच्या शाळेचे कामकाज कसे चालते ते पाहिले. शिक्षक किती तळमळीने शिकवतात ते बघितले होते.
दुसरीतील मुलगा खेळता-खेळता पडला. थोडेसे खरचटले. मम्मा, असे म्हणत रडत तो तसाच पालथा पडून राहिला. गंभीर दुखापत झाली की काय, असे वाटून मी त्याच्याजवळ गेले. दोन वर्षे आईची सवय झालेला तो कदाचित त्या वात्सल्याची व सहानुभूतीची वाट पाहात असावा, असे वाटले. मी त्याला मायेने उठवले, तसा तो सावरला. वर्ग त्याच्याभोवती गोळा झाला. मग तो औषध लावून घ्यायला तयार झाला. हे चित्र नवीनच होते, कारण एरवी पहिलीतील मुले सुद्धा पटकन सावरतात. हा मला काही शिकवून जाणारा प्रसंग.
दुसरी-तिसरीतील मुले फुटबॉल खेळायचा म्हणून हट्ट करू लागली. काहीच खेळ न पाहिलेली ही मुले फक्त चेंडूला लाथा मारणार हे निश्चित होते. पण बालहट्ट मोडावा असे वाटले नाही. तसेच झाले. सगळी मुले एकाच वेळी लाथा मारत एकमेकांना धडकत पुढे-पुढे गेली. मैदान ओलांडून पुढे बास्केटबॉल मैदानात पोहोचली व तोच चेंडू हाताने उचलून बास्केटमध्ये टाकू लागली. आधी हसू आले. शारीरिक शिक्षणाची शिक्षिका म्हणून विचारातही पडले. एरवी ही मुले मोठ्या मुलांचे खेळ येता-जाता पाहात शिकत असतात. पण दोन वर्षे काहीच खेळ न बघितलेली ही मुले किती निष्पाप भावनेने खेळत आहेत व निखळ आनंद लुटत आहेत, असेही वाटून गेले.
विषय शिकवताना वर्गात मुले जेव्हा समोर आली तेव्हा अस्वस्थ वाटली. आम्हाला पुढचे आव्हानात्मक बदल करून शिकवावे लागणार हे आमची मुले सूचितच करत होते जणू! दीर्घ काळाचा उपवास भरून काढण्यासाठी हायस्कूलची मुले वर्गात दंगा करू लागली. मित्र-मैत्रिणींशी किती गप्पा मारू नि किती नको, असे त्यांना झाले होते. एकत्र डबा खाणे, मित्र- मैत्रिणींबरोबर गप्पा-टप्पा, मैदानात खेळायला मिळाल्याने मुले लवकरच सावरली. मेहनत घेऊ लागली व आमचा जीव भांड्यात पडला. आमचे शाळेचे प्रांगण असे गजबजून गेले.

(लेखिका एस. इ. एस. गुरुकुल शाळा येथे शिक्षिका आहेत.)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80040 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top