
विदर्भ-मराठवाडा वगळता इतरत्र मोठ्या पावसाची प्रतिक्षा
पुणे, ता. १५ ः राज्याचा अर्धा भाग मॉन्सूनने व्यापला. मात्र या भागात पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मॉन्सून येऊनही लांबणाऱ्या पावसाअभावी पेरणीच्या कामांना उशीर होत आहे. पर्यायाने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ चालू आहे. अजूनही या भागात जोरदार मॉन्सूनच्या सरींची प्रतिक्षा आहे. या उलट विदर्भ-मराठवाड्यात मात्र मॉन्सून पूर्व पाऊस जोरदार बॅटींग करत आहे. गुरुवारी (ता. १६) विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर कोकणात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पूर्व उत्तर प्रदेशापासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून कच्छ, नैर्ऋत्य राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. विदर्भासह पूर्व भारतातील राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या ढगांची दाटी झाली आहे.
राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात काही ठिकाणी तापमान अद्यापही चाळिशीपार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाने दडी मारली असली तरी मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे.
मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.
विदर्भ : अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80292 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..