
अवतीभवती
‘प्रमेह’वरील वेबिनारला प्रतिसाद
पुणे : आयुर्वेद रसायनीतर्फे आयुर्वेदातील वैद्य आणि विद्यार्थ्यांसाठी प्रमेह या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला. डायबेटिस (मधुमेहाचे) वाढते प्रमाण पाहता मधुमेहाच्या रुग्णांवर अगदी सुलभ पद्धतीने आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी वैद्यांना मार्गदर्शन व्हावे, या हेतूने आयुर्वेद रसायनीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गोव्यातील वैद्य उपेंद्र दीक्षित यांनी या रोगाच्या निदान व संप्राप्तीबाबत माहिती दिली. वैद्य योगेश बेंडाळे यांनी रसशास्त्रीय पद्धतीने प्रमेहावरील उपचारांचे केस स्टडीच्या साहाय्याने मार्गदर्शन केले. वैद्य आदिश काळे यांनी आयुर्वेदातील प्रमेहाच्या व्यवस्थापनासाठी रसायनांचे असलेले महत्त्व समजावले. रसायनी या प्रकारचे उपक्रम पुढेही राबवत राहील, असा मानस वैद्य बेंडाळे यांनी व्यक्त केला.
डॉ. नीलम गोऱ्हे झाशी दौऱ्यावर
पुणे : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सहभागी झाल्या आहेत. या वेळी त्या झाशीचे पहिले खासदार रघुनाथ धुळेकर यांच्या परिवारास भेट देणार आहेत. त्यांच्या सूनबाई आणि डॉ. गोऱ्हे यांच्या आत्या इतिहास संशोधक डॉ. लता धुळेकर यांनी बुंदेलखंड पन्ना राज्य व मराठ्यांचे संबंध यांच्यावर डॉक्टरेट केली आहे. त्यांच्याशी संवाद साधणार असून, झाशीच्या राणीचे स्मारक वस्तू संग्रहालय आदी ठिकाणी त्या भेट देतील.
आचार्य अत्रे भावनांची कदर करणारे लेखक : वझे
पुणे : मोरारजींच्या काळात मुंबईत १०६ माणसे गोळीबारात मारली गेली. त्यावेळी दैनिक मराठामध्ये आचार्य अत्रे यांनी गोळीबार करणाऱ्यांना महारोग होवो, त्यांच्या हाताची बोटे झडोत असे लिहिले. हे लिखाण अनेकांना अतिरेकी वाटले. पण ज्यांची लहानगी मुले व ज्यांच्या घरची माणसे मेली, त्या आईबापांचे हे शिव्याशाप अत्र्यांनी लिहिले होते. ते भावनांची कदर करणारे लेखक होते, असे मत प्रा. माधव वझे यांनी व्यक्त केले. पुंडलिक लव्हे लिखित ‘आचार्य अत्रे विनोद आणि आठवणी’ व ‘आचार्य अत्रे झेप व झुंज’ या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात व आचार्य अत्रे यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रा. श्याम भुर्के, केशर पवार, महादेव पठारे, सुहास बोकील, पद्मकांत कुदळे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी दिलीप राऊत, मधुकर राऊत, ॲड. अशोक पलांडे, सदाशिव पवार आदी उपस्थित होते. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. तर वर्षा लव्हे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80610 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..