
गट ‘क’ सेवा संयुक्त परीक्षेच्या पद संख्येत वाढ
पुणे, ता. १६ ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त परीक्षा २०२१ ही परीक्षा ९०० पदांसाठी जाहीर केली होती. आता पद संख्येत वाढ करण्यात आली असून ही परीक्षा आता १६६५ पदांसाठी घेण्यात येणार असल्याची एमपीएससीने घोषणा केली आहे. या घोषणेचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले असून त्यांचा उत्साह वाढला आहे.
सामान्य प्रशासन विभागाकडून लिपिक-टंकलेखक आणि कर सहायक या संवर्गाच्या वाढीव पदांचे मागणीपत्र एमपीएससीला प्राप्त झाले आहे. त्यामुळे कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक या संवर्गाच्या पद संख्येत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वीच्या जाहिरातीत कर सहायक संवर्गासाठी ११७ पदे आणि लिपिक-टंकलेखक (मराठी) संवर्गासाठी ४७३ पदे भरली जाणार होती. आता अनुक्रमे २८५ आणि १०७७ पदांसाठी परीक्षा होणार आहे. आता या परीक्षेची दुसरी उत्तरतालिका जाहीर केली आहे. आणि त्याच दरम्यान जागा वाढी बाबतचीही घोषणा एमपीएससीने केली आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी आता अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे. एमपीएससीकडून लिपिक-टंकलेखक (इंग्रजी, मराठी), तांत्रिक सहाय्यक, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि कर सहाय्यक पदांसाठी गट क पदांसाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा घेण्यात येते. या पदांच्या ९०० जागांसाठी ३ एप्रिल रोजी पूर्व परीक्षा घेतली. वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा ६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
कोरोनामुळे राज्यातील विविध विभागातील पदभरती रखडलेली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सरकारने १५ हजारपेक्षा जास्त पदे भरण्याचा निर्णय जाहीर केला होता. विविध जाहीर झालेल्या जाहिरातीत पाहिले असता, पद संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे तत्काळ जागा वाढविण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.
राज्य सरकारने मागणीपत्र पाठविल्यामुळे दोन पदांच्या जागा वाढल्या आहेत. राज्य सेवा परीक्षेच्या पद संख्येत देखील वाढ करावी. केवळ १६१ पदांसाठी राज्य सेवा परीक्षा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. ते विद्यार्थी सातत्याने पद संख्या वाढविण्याची मागणी करत आहेत. तसेच उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार पदांसह इतर गट अ पदांचा समावेश करावा, यासाठी ट्विटर मोहीम राबवीत आहेत. याकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. या घोषणेचे स्वागत आहे.
- महेश बडे, विद्यार्थी प्रतिनिधी
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m80629 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..