
मेट्रो विस्तारीकरणाचा डीपीआर पुन्हा करणार
पुणे, ता. १७ : शिवाजीनगर ते लोणी काळभोर दरम्यानच्या मेट्रो विस्तारीकरणाचा पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेला प्रकल्प अहवाल महामेट्रोने सुधारित करावा, त्यामध्ये खडकवासला ते स्वारगेट आणि एसएनडीटी ते खडकवासला या दरम्यानच्या मेट्रो मार्गांचा समावेश करावा, त्याचबरोबरच हे विस्तारीकरणाचे काम ‘पीपीपी’ की ‘ईपीसी’ मॉडेल पद्धतीने करावे, याचा अभ्यास करून पुन्हा अहवाल ‘पुमटा’समोर सादर करावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे युनिफाईड अर्बन ट्रान्स्पोर्ट ॲथॉरिटीची (पुमटा) शुक्रवारी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.
पुणे शहरात हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे, तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोने घेतले आहे. पीएमआरडीए आणि महामेट्रोने दोन्ही मार्गांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे, तर खडकवासला ते खराडी हा २८ किलोमीटर मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे. त्यानुसार पीएमआरडीएचा विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर, तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे. महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे. या दोन्ही मार्गावर पुलगेट ते हडसपर हा आठ किलोमीटर लांबीचा मार्ग कॉमन (एकत्रित) असल्यामुळे तो कोणी विकसित करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर मध्यंतरी झालेल्या ‘पुमटा’च्या बैठकीत पुलगेट ते हडपसर दरम्यान आठ किलोमीटर मार्गाचा तांत्रिक व आर्थिक अहवाल पीएमआरडीए आणि महामेट्रोने स्वतंत्रपणे तयार करावा, त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कोणता प्रकल्प व्यवहार्य आहे, त्यावर कोणी त्या मार्गाचे काम करावे, यावर निर्णय घेण्यात यावा, असे ठरले होते.
पीपीपी मॉडेलर की इपीसी ?
त्यानुसार शुक्रवारी झालेल्या बैठकीत शिवाजीनगर ते लोणीकाळभोर दरम्यान पीएमआरडीएने तयार केलेल्या प्रकल्प अहवाल महामेट्रोने सुधारित करावा, तो करताना खडकवासला ते स्वारगेट आणि एसएनडीटी ते खडकवासला या मार्गाचा समावेश त्यामध्ये करावा, त्याचबरोबरच हडपसर ते सासवड आणि हडपसर ते खराडी या दरम्यनाच्या मेट्रो विस्तारीकरणाबाबतचा विचार करावा, त्याचबरोबरच विस्तारीकरणाचे काम हे पीपीपी मॉडेलवर की इपीसी (ठेकेदाराकडून काम करून घेणे आणि त्या मोबदल्यात पैसे देणे) या तत्त्वावर करावे, याबाबतचाही अहवाल सादर करावा. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m81061 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..